कविता : गाभारा 

मला ठाऊक आहे

मीच सोडलंय तुला

पण, तू तरी कुठे प्रतिकार केलास?

तू प्रतिकार केला नाहीस… 

माझ्या वागण्याला पुष्टी मिळाली

दुखऱ्या मनाने घेतलेला निर्णय 

अहंकार जागृत करून गेला

आणि मन आणखी आणखी कडू होत गेलं

गतकाळाचा विचार करताना जाणवत गेलं

की विरघळण्याचे क्षण तर खूप होते

मग आपलं विरघळणं खोटं होतं का?

की आपण फारच प्रसंगानुरूप वागतो?  

आपल्याला आयुष्यात काय हवंय 

हे त्या त्या क्षणी न कळण्याचा शाप आहे का?

‘कुठलीच भावना खोटी नसते’

असं जर मानलं तर

त्या वेळचं भिजणं आणि आताचं कोरडेपण

असं कसं न्याय्य असू शकतं?

एकत्र साजरे केलेले वाढदिवस

अचानक भेटून दिलेलं सरप्राइज

छोट्या छोट्या यशापयशांचं केलेलं सेलिब्रेशन

आयुष्यातलं पहिलं चियर्स

आणि पहिला झुरका घेतलेले क्षण

जणू काही मोहीमच  फत्ते केली होती

तुला असं नाही का वाटत की

‘तू – माझं’ असणं खूप छान होतं?

आणि ‘मी – तुझं’ असण्याला तर

मी देवळाच्या गाभाऱ्याचं स्थान दिलं होतं…

Author

Leave a Reply