अंतर्नाद उदयास्त – पुस्तक रसग्रहण

अंतर्नाद – एका मासिकाचा उदयास्त  

नुकतेच भानू काळे यांचे ‘एका मासिकाचा उदयास्त’ हे पुस्तक वाचनात आले. काळे यांनी अंतर्नाद हे नियतकालिक १९९५ पासून २३ वर्षं मासिक स्वरूपात आणि आणखी ३ वर्षं ‘दिवाळी अंक’ या स्वरूपात मालक आणि संपादक अशा दुहेरी भूमिकेतून प्रसिद्ध केले. या पुस्तकात स्मरणरंजन, किस्सेवजा कथन (anecdotal account), सूची, विचारमंथन असे विविध प्रकार आढळतात. एका प्रकारे हे पुस्तकाचे सामर्थ्य आहे; कारण त्यामुळे अंतर्नाद या साहित्यघटनेकडे वाचक ३६०° कोनातून बघू शकतो. अर्थात एवढे असूनही त्यातली तिसरी मिती राहून जाते; त्यामुळे मालक/संपादकाची अंतर्नादमधली भावनिक गुंतागुंत पाहता विहंगमावलोकनासाठी ते काम कोणी तिसर्‍याच त्रयस्थाने केले पाहिजे असे वाटून जाते.      

अंतर्नादसाठी नवे लेखक शोधून काढणे आणि कसदार लेखकांची फळी उभारणे हे एक आव्हान होते.  एके ठिकाणी काळे म्हणतात की अनेक मोठ्या लेखकांचे उत्तम लिखाण त्यांच्या पंचविशीत झालेले आहे. हे खरेच आहे. एवढेच कशाला, आइन्स्टाइनपासून ते नील्स बोहरपर्यंत अनेक महान वैज्ञानिकांचे महत्त्वाचे संशोधनही २५ ते ३५ या वयात झालेले आहे. एक गोष्ट नक्की — पंचविशीतली उत्स्फूर्तता आणि जोम लेखकाला आयुष्यात नंतर मिळणे शक्य नाही; याउलट पुढच्या काही दशकांमधल्या अनुभवाची भरपाई त्या उत्स्फूर्ततेतून किंवा जोमातून होणार नाही हेही तितकेच खरे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ हा अगदी तरुण वयातला काव्यसंग्रह   पण ‘नटसम्राट’ हे नाटक परिपक्व वयातले आहे. ‘ती फुलराणी’ हे पुलंच्या नातवंडासारखे आहे असे विधान एका समीक्षकाने केले होते. विश्राम बेडेकरांचे ‘रणांगण’चे लेखन ऐन तारुण्यातले आहे; तर ‘टिळक आणि आगरकर’ हे उतारवयातले आहे. कोसला आणि हिंदू या भालचंद्र नेमाड्यांच्या किंवा क्रौंचवध आणि ययाति या वि. स. खांडेकरांच्या अनुक्रमे तरुण आणि प्रौढ वयात लिहिलेल्या कादंबर्‍या पाहता लेखक पंचविशीत आणि साठीनंतरही समर्थपणे लिहू शकतो हे आपल्या लक्षात येईल. 

ज्यांचे प्रथम लेखन अंतर्नादने प्रसिद्ध केले त्यांतली बरीच तरुण मंडळी पुढे लिहायचे थांबली अशी काहीशी खंत काळे यांनी व्यक्त केली आहे. काही जणांच्या बाबतीत हे नैसर्गिक असणार. काहींना दुसरे व्यासपीठ मिळाले नसणार. आपल्याकडे काही ठिकाणी लेखकाला ‘अमक्या-तमक्या गटातला’ अशा प्रकारचे लेबल लागण्याची आणि त्यामुळे इतर काही प्रकाशनांचे दरवाजे बंद होण्याची शक्यता असते; शिवाय जिल्हावार प्रसिद्ध होणार्‍या नियतकालिकांबरोबर संपर्क आणि त्यांच्या प्रकाशनात सहभाग या गोष्टी प्रत्येकाला सहजासहजी जमतीलच असे नाही. अमेरिकेत ‘सिंडिकेटेड कॉलम’ अशी व्यवस्था असते. तशी व्यवस्था आपल्याकडे असती तर एकाच लेखकाचे स्तंभलेखन एकाच वेळी अनेक स्थानिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होऊ शकले असते; मात्र नवा संपादक नेमताना तो चाळिशीतला असावा या काळे यांच्या मताशी बहुतेक वाचक सहमत असतील. स्वतः काळे यांनी अंतर्नाद मासिक सुरू केले, तेव्हा ते साधारण त्याच वयोगटात होते.  अमेरिकेतल्या काही कट्टर व्यावसायिक कंपन्यांमध्येसुद्धा नवा सीईओ नेमताना तो ४५ पेक्षा जास्त वयाचा नसावा असा नियम असतो.      

हे पुस्तक वाचत असताना त्यातले अनेक मुद्दे आपल्याला पटतात, भिडतात किंवा विचार करायला भाग पाडतात.       

राजा राजवाडे यांचा ‘अंतर्नादची सत्यकथा होणार नाही याची काळजी घ्यावी’ हा इशारा एका प्रकारे बरोबरच होता. सत्यकथा बंद पडल्यावर, “संपादक म्हणून माझा वाचकांबरोबर असलेला संबंध कमी कमी होत गेला,” अशा आशयाचे काहीतरी विधान राम पटवर्धनांनी केल्याचे आठवते आहे. त्यांच्या मते सत्यकथा बंद पडायचे ते एक मोठे कारण होते. अंतर्नादच्या संपादक पदासाठी योग्य वेळी उत्तराधिकारी नेमण्याची प्रक्रिया (succession planning) झाली नाही. (तशी ती सत्यकथेच्या बाबतीतही झाली नसावी का?) अंतर्नाद चालू ठेवण्यासाठी काळे यांना फारसा incentive राहिला नाही. आर्थिक प्रलोभन तर नव्हतेच. एके काळी मराठी साहित्य विश्वावर फार मोठा प्रभाव पाडलेल्या प्रकाशन संस्थांच्या मालक / संपादक यांच्या पुढच्या पिढीलासुद्धा मराठी ललित साहित्याच्या प्रकाशन व्यवसायात तितकेसे स्वारस्य राहिलेले दिसत नाही.  

मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण मुले अधिक चांगल्या प्रकारे ग्रहण करतात – या लोकप्रिय मताला काळे यांनी दुजोरा दिलेला आहे; पण हे संपूर्णपणे खरे आहे का? इंग्रजी माध्यमातून दिलेले शिक्षण हे घरच्या परिस्थितीनुसार मुलांना सोपे किंवा जड जाईल. आज मध्यमवर्गीय समाजातल्या अनेक मुलांना ही समस्या नाही; शिवाय आता आंतरधर्मीय, आंतरप्रांतीय विवाहांची वाढती संख्या पाहता अशा जोडप्यांच्या मुलांची मातृभाषा कोणती असेल?  

काही लोक असे सांगतात की शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून न झाल्याचा त्यांना पुढच्या शिक्षणात तोटा झाला नाही. या बाबतीत डॉ. जयंत नारळीकर यांचेही उदाहरण दिले जाते. यात दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे डॉ.नारळीकरांसारख्या प्रज्ञावंताचा अनुभव सर्वसामान्य मुलांना लागू पडणार नाही, दुसरे म्हणजे, त्यांचे स्वतःचे शालेय शिक्षण मराठीत नाही; तर बनारसला हिंदी भाषेतून झाले होते. त्यातही त्यांना काही अडचण आली नाही.      

सुरुवातीच्या वर्षांमध्ये आय.आय.टी. प्रवेशासाठी इंग्रजी विषयाचे गुण हे विज्ञान आणि गणित या विषयांच्या बरोबरीने धरले जात होते. १९७० च्या दशकात इंग्रजी विषयातले गुण प्रवेशासाठी विचारात न घेता फक्त त्या विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक असेल अशी नवी पद्धत आली. जुन्या पद्धतीत मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या मुलांना इंग्रजी विषयात कमी गुण मिळाल्यामुळे त्यांची गुणवत्ता यादीत घसरण होण्याची आणि त्यामुळे प्रवेश न मिळण्याची किंवा मनासारखी शाखा न मिळण्याची शक्यता बरीच होती. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांना मात्र जुन्या पद्धतीचा फायदा होत होता. इंग्रजी विषयातले गुण जरी गुणवत्ता यादीसाठी धरले नाहीत; तरी इतर विषयांची परीक्षा मात्र इंग्रजीमधूनच द्यावी लागत होती. मातृभाषेतून विज्ञान, तंत्रज्ञान वगैरे विषयांची परीक्षा देण्याची मुभा दिली; तरी स्पर्धात्मक क्षेत्रांत अशा सवलती देण्यावर मर्यादा आहेत; शिवाय अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या प्रांताबाहेर करिअर करण्याची दारे बंद करण्यासारखे आहे. याचा अर्थ शिक्षणाच्या माध्यमाचा विचार सर्वांगाने करायला पाहिजे. त्यात विषय समजून घेण्यातली सहजता आणि भविष्यातली संधी या परस्परविरोधी घटकांमध्ये समतोल साधला गेला पाहिजे.     

मराठी मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पुढची अनेक वर्षे तांत्रिक आणि वैज्ञानिक पुस्तके मराठीत भाषांतरित करावी लागतील. हा व्याप एवढा मोठा आणि खर्चिक आहे की हे करण्यापेक्षा मुलांना इंग्रजी शिकवणे अधिक सोपे आणि फायद्याचे होऊ शकेल हा विचार गंभीरपणे केला पाहिजे; शिवाय जगभरातून नव्याने येणार्‍या पुस्तकांची संख्या लक्षात घेता, भाषांतराचे काम हे कधीही न संपणारे असेल. जेव्हा मूळ पुस्तके मराठीत लिहिली जातील (त्यासाठी आपल्याकडे मूलभूत संशोधन होणे आणि त्यावर मराठीमधून लेखन होणे आवश्यक आहे) तेव्हा कदाचित इंग्रजी-मराठी आणि मराठी-इंग्रजी अशी भाषांतरे व्यवहार्य होतील.

काळे यांनी साहित्यातल्या दुर्बोधतेबद्दल भाष्य करताना व्यामिश्रता आणि दुर्बोधता यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे आणि हा मुद्दा अगदी समर्पक आहे. काही नावाजलेल्या साहित्यिकांनी दुर्बोधतेचा केलेला पुरस्कार हा   इतरांच्या तुलनेत स्वतःचे स्थान काहीतरी विशेष असल्याचे लोकांच्या मनात ठसवण्याच्या  ईच्छेपोटी असावा  की काय असा संशय येत असे; त्यामुळे नैसर्गिक सौंदर्यासारखी दुर्बोधता आणि ‘मेकपने’ आणलेल्या सौंदर्यासारखी दुर्बोधता यांत फरक करायला पाहिजे, असे आपण म्हणू शकतो. 

काळे यांचे गद्यसदृश कवितांबद्दलचे असमाधान याही मुद्द्यावर अनेक वाचकांचे त्यांच्याशी एकमत होईल. अंतर्नादमध्ये निवडलेल्या कविता या मुद्द्याची उदाहरणे म्हणून देता येतील. ‘असा मी, असा मी’च्या सुरुवातीला पु. ल. म्हणतात की, ‘आपल्याकडे काय सांगितलंय यापेक्षा कोणी सांगितलंय याला लोक जास्त महत्त्व देतात.’ जीएंच्या मते ‘साहित्यात काय सांगितलंय यापेक्षा कसं सांगितलंय याला जास्त महत्त्व असायला पाहिजे.’ काही सन्माननीय अपवाद वगळता, सध्याच्या दिवाळी अंकांमधल्या विपुल स्वरूपात प्रसिद्ध होणार्‍या कवितांमधून हेच मुद्दे कुठेतरी हरवून जाताना दिसतात.    

अनेक मराठी लेखक फक्त मराठीतच लेखन करतात. जे काही थोडे मराठी लेखक इंग्रजी लेखन करतात त्यांच्या इंग्रजी लेखनावर मराठीची छाप दिसून येते असे काळे यांना वाटते. केवळ आपल्या उच्चारांवरच नाही तर व्याकरण आणि शैलीवरही मराठीची छाप दिसून येते हे कोणी अमान्य करू शकणार नाही. फक्त मराठीच नव्हे तर सर्वच भारतीय भाषकांच्या बाबतीत हे आढळून येते. त्यात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून मान्यता पावलेले काही मोठे लेखकही येतात. थोडक्यात म्हणजे ‘इंडियन इंग्लिश’ असा काही प्रकार आहे (त्यातही प्रांतिक उपप्रकार आहेत) हे मान्य करायला हरकत नाही. तसेही इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांमधले लोक आपापल्या पद्धतीने बोलतात/लिहितात. तेव्हा मूळ नियमांची मोडतोड न करता आपण आपल्या पद्धतीने लिहायला संकोचायचे कारण नाही.   

आपले लेखक दुसर्‍या कोणी पळवू नयेत म्हणून लेखकाचा पत्ता, फोन, इमेल अशी माहिती न छापणारे संपादक अजून आहेत असा उल्लेख या पुस्तकात आहे. हे खरेच आहे आणि तितकेच ते आश्चर्यकारक आहे. सध्या अनेक लेखकांचे लेखन अनेक मासिकांतून प्रसिद्ध होत असते; त्यांतल्या काही अंकांमध्ये लेखकांची मेल/फोन वगैरे माहिती दिली जाते; त्यामुळे फक्त इतर काही संपादकांनी ती माहिती दडवल्यामुळे काहीही साध्य होणार नाही इतकी साधी गोष्ट लक्षात घेतली जात नाही.  

मराठी लेखकांना मिळणारे मानधन इतके हास्यास्पद आहे की त्यावर काय बोलावे असा प्रश्न पडतो. त्यावरही काळे यांनी मतप्रदर्शन केले आहे. त्यांतल्या काही लहान नियतकालिकांना जास्त मानधन देणे परवडत नसेल असे जरी मानले; तरी मोठ्या नियतकालिकांच्या मानधनाचे आकडे – विशेषतः इंग्रजी नियतकालिकांच्या मानधनाच्या तुलनेत नगण्यच असतात.       

“सौंदर्याची जाणीव रसिकांच्या मनात निर्माण करायचे सामर्थ्य हा कुठल्याही चित्राच्या श्रेष्ठत्वमापनाचा एक निकष असायला हवा. आज जी चित्रे लाखो-करोडो रुपयांना विकली जातात व त्यामुळे अधूनमधून वृत्तपत्रांतून आपल्या नजरेस पडतात; त्यांपैकी बहुतेक चित्रे दुर्दैवाने वरील निकषानुसार निरर्थक वाटतात.” काळे यांच्या या भूमिकेशी सर्वसामान्य वाचक सहमत असतील; पण कलाक्षेत्रातल्या फार मोठ्या आर्थिक उलाढालीमधून फायदा मिळवणार्‍यांना आणि दृश्यकला समीक्षकांना हे मान्य होण्याची शक्यता नाही. 

काळे यांनी सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या यादीविषयी लिहिले आहे. या संदर्भात एका ज्येष्ठ लेखिकेने व्यक्त केलेले मत आठवते. त्या म्हणतात की सगळी पुस्तके तर सोडाच; पण संपादकांनी केलेल्या छोट्या यादीतली (short list) अनेक पुस्तके त्यांनी वाचलेली नसतात. अशा परिस्थितीत काही पुस्तके केवळ आपण वाचलेली नाहीत यामुळे आपल्या पसंतीच्या यादीत येत नाहीत, ही गोष्ट त्यांना चुकीची वाटते. संपादकांच्या मागणीनुसार आपल्याला आवडलेल्या पुस्तकांची यादी देणार्‍या लेखक/वाचक/प्रकाशकांचा तोच अनुभव असेल. बहुतेकांनी वाचलेल्या पुस्तकांची संख्या न वाचलेल्या पुस्तकांच्या संख्येपेक्षा कमीच असते. वाचकांच्या सोयीसाठी जर संपादकांनी ५०-१०० पुस्तकांची यादी संदर्भासाठी दिलेली असेल; तर  त्या यादीत नसलेली; पण स्वतः वाचलेली पुस्तके आठवून त्यांचा समावेश आपल्या पसंतीच्या पुस्तकांमध्ये करण्याइतका उत्साह किती जणांकडे असेल? 

‘मराठी साहित्यक्षेत्र प्रौढांपुरते सीमित होत आहे का?’ असा प्रश्न काळे यांना पडलेला दिसतो. तसे बघायला गेले तर विनोदी नाटक/सिनेमा सोडता सर्वच कलाक्षेत्रे प्रौढांपुरती सीमित होत आहेत का असा प्रश्न पडला पाहिजे. सध्या शास्त्रीय संगीत, दर्जेदार नाटके, साहित्यचर्चा यांवर आधारित कार्यक्रमांमध्ये चाळिशीच्या आतल्या (खरेतर पन्नाशीच्या आतल्या) लोकांचा सहभाग क्वचितच आढळतो.  

“. ही संमेलने बंद करा” अशा शीर्षकाखाली एक लेख सत्यकथा ऑक्टोबर १९४४च्या अंकात प्रसिद्ध झाला होता असा उल्लेख काळे यांनी केलेला आहे; ही खरी आश्चर्याची गोष्ट आहे; कारण त्या आधीचे संमेलनाध्यक्ष जबरदस्त होते. सावरकर (१९३९), खांडेकर (१९४०), फडके (१९४१), अत्रे (१९४२), माटे (१९४३), वरेरकर (१९४४). हा मूळ लेख वाचायला मिळाला तर त्याही वेळी ही संमेलने का बंद करावीशी वाटली हे समजून घेता येईल. 

१९८० साली भरलेले समांतर साहित्य संमेलन नंतर परत झाले नाही यावरही काळे यांनी काही मतप्रदर्शन केले आहे. समांतर संमेलन परत झाले नाही; कारण केवळ काही स्वयंसेवकांच्या जोरावर हे दीर्घकाळ होऊ शकत नाही. साने गुरुजींनी अनेक नियतकालिके काढली आणि ती बंद पडली. साधनासुद्धा खर्‍या अर्थाने त्यांच्या पश्चात समाजवाद्यांनी चालवले आणि पुढे आणले. ती निष्ठावंतांची फळी मोठी होती. 

संमेलनांबाबत आणखी एक कळीचा मुद्दा म्हणजे साहित्यिक स्वखर्चाने संमेलनाला जायला उत्सुक नसतात. कन्सल्टिंग क्षेत्रात अनेक लोक स्वखर्चाने अनेक परिषदांना जातात. तिथे त्यांना ‘नेटवर्किंग’ म्हणजे इतर लेखक, वाचक, प्रकाशक यांच्याबरोबर विचारांची देवाणघेवाण महत्त्वाची वाटते. त्यावर त्यांच्या भविष्यातल्या व्यवसायात फायदा होऊ शकतो. मराठीमधे साहित्याला असे व्यावसायिक (धंदेवाईक नव्हे) स्वरूप आलेले नाही. प्राध्यापक, पत्रकार, वगैरे लोक लेखन करतात; पण पु.भा.भाव्यांसारखे फक्त लेखन करणारे अपवाद. त्यातून गदिमा, पुल, अत्रे या लोकांनी चित्रपट/नाटक यांवर बराच पैसा केला – फक्त लेखनावर नाही. काही लेखकांची तर आम्ही कोणत्याच संमेलनाला जाणार नाही अशी तात्त्विक भूमिका असते.

“आपला साहित्यव्यवहार खूप अपारदर्शी आहे,” अशी खंत काळे यांनी व्यक्त केली आहे. कदाचित मराठी पुस्तके मोठ्या प्रमाणात किंडलवर न येण्याचे हेही एक कारण असावे. यावर उपाय प्रकाशक आणि लेखक (आणि वाचकही) यांनी एकत्र येऊन शोधायला हवा.     

एखाद्या मासिकाच्या/नियतकालिकाच्या व्यवसायाचे जे गणित आहे, (ज्यातून आंतर्नाद आणि काळे यांचीही सुटका नव्हती) त्यावर आधारित अशा प्रकारच्या शक्यता समोर येतात.   

१ हे नियतकालिक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असेल – जसे ‘श्री’ साप्ताहिक.

२ हे नियतकालिक ब्रेक इव्हन पॉइंटवर किंवा थोडे मागे पुढे चालेल. त्यात फारसे नुकसान होणार नाही; पण फायद्याचे प्रमाणही अल्प असेल, त्यासाठी या कामावरची अविचल निष्ठा आवश्यक असेल. (पण succession planning झाले नाही तर ते आज ना उद्या बंद होणार यात शंका नाही.) 

३ कोणीतरी प्रचंड पैसेवाला काही कारणाने हे चालवेल. आज मुंबईमध्ये नीता मुकेश अंबानी सेंटर असे बांधलेले आहे की आपल्या हयातीत (किंवा कदाचित कधीच) त्यातून आर्थिक फायदा होणार नाही; पण ‘इतका पैसा मिळवल्यावर काहीतरी आपल्या नावाला साजेसे आणि लोकांच्या लक्षात राहील असे करावे’ असा विचार त्यामागे असू शकतो. किर्लोस्कर मासिकाला तशी संधी होती; पण शंतनुरावांना ते मान्य नव्हते असे ऐकतो. अशा वेळी मुकुंदराव किर्लोस्करांनी स्वतः हे मासिक चालवायला का घेतले नाही असा प्रश्न पडतो. कदाचित शंतनुरावांचे कुटुंबातले किंवा किर्लोस्कर उद्योग समूहातले स्थान असे होते की मुकुंदरावांनी त्यांच्या विरोधात जायचे धाडस केले नसावे.  

अंतर्नाद श्री साप्तहिकाच्या मार्गाने जाणे शक्यच नव्हते आणि कोणीतरी पैसेवाला हे मासिक दीर्घकाळ चालवेल हे केवळ दिवास्वप्न असण्याची शक्यता जास्त. अंतर्नादने फार नफ्याची अपेक्षा न ठेवता २५ वर्षं आपले अस्तित्व कायम राखले . पण ते केव्हातरी बंद पडणे अपरिहार्य होते असे म्हणावे लागेल.  

कसदार साहित्य फारच कमी प्रमाणात हाती येते अशी खंत काळे यांनी व्यक्त केली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये असाच अनुभव येतो. कस्टमरच्या काही प्रॉजेक्टसाठी लोक उपलब्ध नसतात; पण त्याच वेळी शेकडो लोक ‘बेंचवर’ – म्हणजे कुठल्याही कामाशिवाय पडून राहिलेले असतात; याचे कारण skills mismatch. संपादकांना वाटते की कसदार साहित्य मिळत नाही; पण आपले चांगले साहित्य प्रसिद्ध करायला संपादक तयार नसतात अशी तक्रार करणारे अनेक लेखक असतील. त्यातूनच सत्यकथा मासिक जाळण्याचा प्रकार झाला. काही लोकांना वाटू शकेल की आपले साहित्य नाकारले गेल्यामुळे हे लेखक उगाच तक्रार करत राहतात; पण कोणत्याही लेखनामागचे प्रयत्न आणि विचार संपादकांपर्यंत पोहचतात की नाही; या प्रश्नाचाही गंभीरपणे विचार करावा लागेल. 

संपादकांनी नाकारल्यामुळे किंवा काही बदल सुचवल्यामुळे मूळ कथांचे पुनर्लेखन अनेक लेखकांनी केले असेल. अनेक वेळा मूळ कथेपेक्षा ही पुनर्लिखित कथा बरीच जास्त चांगली बनते हा अनुभव बर्‍याच लेखकांना आला असेल. कोणतेही लेखन नाकारण्याचा संपादकीय अधिकार मान्यच आहे; पण तसे करताना सत्यकथेचा दृष्टिकोन काहीसा कालबाह्य झाला असावा का? कुठल्याशा लेखात, ‘आपण काळाप्रमाणे बदलत गेलो नाही’ ही चूक झाल्याचे श्रीपुंनी मान्य केल्याचे आठवते आहे. 

काळे यांना प्रमाणभाषेची काळजी वाटते ती स्वाभाविक आहे. आधी इंग्रजीला विरोध आणि नंतर प्रमाणभाषेला – या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. हे असेच चालू राहिले तर तांत्रिक/व्यावसायिक बाबतींत काही आशाच उरणार नाही. 

विकत घेतलेली पुस्तके वाचली जातात का? एक पाहणी सांगते की ९०% हून अधिक पुस्तके वाचून संपवली जात नाहीत.  स्टीफन हॉकिंगच्या ‘अ ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाइम’ या पुस्तकाच्या लक्षावधी प्रती विकल्या गेल्या; पण बहुतेक लोकांनी हे पुस्तक न वाचता नुसते शोकेसमध्ये मिरवले अशी खंत स्वतः हॉकिंगने व्यक्त केली होती. 

रवींद्रनाथांनंतर पुढची १०० वर्षं इतर कोणत्याही भारतीय लेखकाला नोबेल का मिळू शकले नाही असा प्रश्न काळे यांना पडताना दिसतो. एकतर आपल्या चांगल्या पुस्तकांचे तत्परतेने इंग्रजी अनुवाद होत नाहीत (इतर भाषांच्या तुलनेत). 

चॅट-जीपीटीच्या मते : 

Rabindranath Tagore’s ‘Gitanjali’ was promoted for the Nobel Prize by William Butler Yeats, the Irish poet and Nobel laureate himself. Yeats was instrumental in introducing Tagore’s work to the Western world and played a significant role in bringing Tagore’s poetry to the attention of the Nobel Prize committee. Tagore was eventually awarded the Nobel Prize in Literature in 1913, becoming the first non-European to receive the honor.   

याचा अर्थ नोबेल पुरस्कार समितीपर्यंत गीतांजली पोहचवण्यासाठी विल्यम बटलर येट्स या नोबेल पुरस्कार विजेत्या कवीने मोलाची कामगिरी बजावली होती, दुसरे म्हणजे गीतांजलीचा इंग्रजी अनुवाद स्वतः टागोरांनी अशा प्रकारे केला होता की एका प्रकारे इंग्रजी अनुवाद ही मूळ बंगालीवर आधारित; पण वेगळीच कृती होती असे म्हणावे लागेल. त्यांची इंग्रजीवरही चांगली हुकमत होती. असे दुहेरी भाग्य किती भारतीय साहित्यकृतींना लाभू शकेल? 

अंतर्नाद बंद झाल्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. बहुतेकांनी हे मासिक बंद पडल्याबद्दल खेद व्यक्त केला होता; मात्र ‘तुमचा’ अंतर्नाद बंद पडणारच होता, ‘आमची’ नियतकालिके मात्र चालूच आहेत, असा क्वचित विसंवादी सूरही होता. काळे यांनी यावर काही भाष्य केले नसले; तरी त्यांच्या वतीने सामाजिक माध्यमांवर परस्पर उत्तरेही दिली गेली. एक गोष्ट उघड आहे – प्रत्येक नियतकालिक कधी ना कधी बंद पडणारच आहे. जेवढा काळ ते चालले, त्या काळात त्या नियतकालिकाचे योगदान किती हा महत्त्वाचा प्रश्न असतो. त्या बाबतीत अंतर्नादने बर्‍याच काही गोष्टी साधल्या याचे समाधान मानायला नक्कीच हरकत नाही.       

अंतर्नाद – एका मासिकाचा उदयास्त

लेखक – भानू काळे 

प्रकाशक – मौज प्रकाशन गृह 

पहिली आवृत्ती – फेब्रुवारी २०२४ 

२६८ पाने 

किंमत – रु. ५०० 

Author

2 thoughts on “अंतर्नाद उदयास्त – पुस्तक रसग्रहण

  1. अंतर्नाद हे दर्जेदार असे नियतकालिक होते. विवेक गेविलकरने ह्या बद्दल लिहून ज्या वाचकांना ह्या नियतकालिकाबद्दल माहिती नव्हते अशा वाचंकाच्या मनामध्ये त्याविषयी कुतुहल जागृक करण्याचे काम केले आहे. मी ह्या मासिकाचा वाचक होतो. आज हे मासिक बंद पडले ह्याची हूरहूर मात्र खूप वाटते.

  2. विवेक सर, पुस्तक परीक्षण करताना तुम्ही प्रत्येक मुद्दा तावूनसुलाखून वाचकांपुढे ठेवला आहे… त्यामुळे परीक्षण तर वाचनीय झाले आहेच पण पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढते 🙏

Leave a Reply