नाही पुण्याची मोजणी

नाही पुण्याची मोजणी

नाही पापाची टोचणी

जिणे गंगौघाचे पाणी

कशाचा न लागभग

कशाचा न पाठलाग

आम्ही हो फुलांचे पराग

आम्हा नाही नाम-रूप

आम्ही आकाशस्वरूप

जसा निळा निळा धूप

पूजेतल्या पानाफुला

मृत्यू सर्वांग सोहळा

धन्य निर्माल्याची कळा

—बा. भ. बोरकर

मोठ्या रुबाबात ‘पोएट बोरकर’ अशी स्वतःची ओळख करून देणारे कविवर बाळकृष्ण भगवंत बोरकर म्हणजेच सर्वांचे लाडके बाकीबाब. जीवनाकडून चहुअंगाने आनंद गोळा करणारी रसिक व्यक्ती आणि आपले विचारधन दोन्ही हातांनी अत्यंत सहजतेने वाटून टाकणारे, मागल्या पिढीतील ख्यातनाम प्रतिभावंत कवी. आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करत असताना निरपेक्ष सहजतेने जीवनाचा सारांश आणि जगण्याचे स्वतःचे तत्त्वज्ञान मोजक्या, समर्पक रूपकांच्या माध्यमांतून उलगडण्याचे त्यांचे कौशल्य दर्शवणारी त्यांची ही सर्वांगसुंदर कविता – नाही पुण्याची मोजणी…!

बोरकरांनी आयुष्याला प्रवास म्हटले नाही. त्यांच्यालेखी तो प्रवाह आहे, वाहता ओघ आहे. तोही कसा? गंगेसारखा निर्लेप; परंतु त्या अलिप्ततेमुळे त्यांचा आत्मविश्वास ढळलेला नाही. जगण्याची सार्थकता ज्यातून डोकावते असे नेमके शब्द —‘जिणे गंगौघाचे पाणी!’ सारासार विचार, तारतम्य बाळगणारी बुद्धी आणि विवेकी मन ह्या साऱ्यांचे वर्णन त्या तीन शब्दांत सामावले आहे. येईल त्याला सोबत घेत, जगाला पुनित करत जाणारी गंगा; पण ती कशी? सतत वाहती! संथ वा कुंठित झालेली नव्हे. आयुष्य आवेगाने जगण्याचे प्रतीकच जणू!

त्या जीवनगंगेला ना कशाचा गर्व, ना कशाची तमा; ना खेद ना खंत. ना कशाची आस, ना कशाचा हव्यास. तिला ना कशाच्यामागे धावायचे आहे ना काही मागायचे आहे. कवीदेखील त्याच निरिच्छ तरीही सर्वानुभवी वृत्तीने जगला आहे. त्याला काही पटवून द्यायचे नाही. काही सिद्ध करायचे नाही. फुलातले इवलेसे पराग, बीज अंकुरण्याची आपली क्षमता जाणून असले तरी त्याबाबतीत आग्रही नसतात. पुष्पपरागांप्रमाणेच जीवनाकडे साक्षीभावाने बघण्याचे कवीचे सामर्थ्य ‘आम्ही हो फुलांचे पराग’ ह्या नेमक्या शब्दांतून प्रतीत होते. 

आपल्या काव्यप्रतिभेवर आणि ती  प्रभावीपणे सादर करण्याच्या क्षमतेवर बोरकरांच्या दृढ विश्वास होता. कवी म्हणून स्वतःचे अस्तित्व वा श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची त्यांना कधी गरज भासली नाही. नानाविध भावभावना व्यक्त करत जाणाऱ्या त्यांच्या अनेक कवितांमधून रसिकांना ते सहज सापडत गेले. ’आम्हा नाही नाम-रूप…’ ह्या ओळीतून त्यांनी हाच संदेश दिला आहे. जे सर्वत्र व्यापून आहे, ज्याचे अस्तित्व नाकारता येत नाही; पण हातात पकडताही येत नाही, बोटांच्या चिमटीत धरून दाखवता येत नाही असे, दूर असूनही जवळ भासणारे निळे आकाश आणि मुठीत न सापडणारा, परंतु वातावरण प्रसन्न करणारा, मुख्य म्हणजे ऊर्ध्वगामी निळा धूप ह्या दोन्हींची उपमा कवी केवळ स्वतःलाच नव्हे तर समस्त कविवर्गाला देतो. जीवनाचे सार्थक करत आपल्या ध्येयाप्रत जाण्याचे उदाहरण जगासमोर ठेवून, बघता बघता अदृश्य होण्याची किमया साधायचे मर्म कवीला गवसले आहे. क्षणभरात विरून जाता जाता आसमंत पवित्र करणारी सुगंधी धूम्रवलये असोत किंवा अवघ्या पृथ्वीतलाला आच्छादणारे अनंत आकाश असो, त्यांच्यासारखे वर्तन हे कवीचे ध्येय आहे; पण त्यात कोणताही अभिनिवेश नाही; आहे तो आत्मविश्वास आणि त्यातून येणारा सार्थ अभिमान – गर्व नव्हे! सर्वव्यापी, हितकारक परिणाम साधण्याची आपली इच्छा आणि क्षमता कवीने आकाशाशी मानलेल्या एकरूपतेद्वारे चित्रित केली आहे.

पाप-पुण्याचा हिशोब न ठेवणारे, आपल्या क्षमतेची अनाग्रही जाणीव बाळगणारे कवी बोरकर जीवनसंध्येला मात्र उत्कटपणे सामोरे जातात. आयुष्याचा चवीने आस्वाद घेत मिळवायचा जीवनानंद, सत्कर्म आणि परोपकार ह्यांची सांगड घालत आयुष्याच्या अंतिम टप्प्याचे हसतमुखाने स्वागत कसे करावे ह्याचे अनेकांनी आपापल्या परीने प्रत्ययकारी वर्णन केले आहे; परंतु ह्या कवितेत बोरकरांनी योजलेल्या रूपकाला मात्र तोड नाही. उद्याच आपण निर्माल्याच्या अवस्थेला पोहोचणार आहोत ह्याची आजच्या पूजेतल्या पानाफुलांना कल्पना असते. परमेश्वर ह्या अंतिम संकल्पनेत विलीन होताना त्यांचा अंत होणार असतो; परंतु त्या निर्माल्यकळेला मृत्यूचा सर्वांग सोहळा समजण्याची जी विलक्षण ताकद त्या चिमुकल्या फुलां-पानांमध्ये असते तीच आपल्यात असावी अशी इच्छा; किंबहुना ती आहेच ह्याची जाण, ती प्रगल्भता ह्या रसिक कवीकडे आहे. मृत्यू ही भयकंपित होण्याची संकल्पना नाहीच; उलट दोन्ही हात पसरून आनंदाने सामोरे जावे असा हा सोहळा आहे. केवळ सोहळाच नव्हे तर सर्वांगसोहळा आहे. साक्षात मृत्यूला जीवनातला सर्वांग सोहळा मानताना कवीला विलक्षण धन्यता वाटते.

 देवाच्या चरणी वाहिलेल्या फुलापानांचे निर्माल्य कोणी पायदळी तुडवत नाही वा ते कचऱ्यात टाकत नाही. त्या निर्माल्याचेसुद्धा एक विशिष्ट पावित्र्य जपले जाते. त्यातच त्या निर्माल्याच्या अतिशय छोट्या आयुष्याची सार्थकता असते. कोणाचेही आयुष्य निरर्थक, ध्येयहीन  नसते – नसावे!  आपापले विहित कर्म निष्कामतेने करत राहावे, निष्क्रिय असू नये म्हणजे आयुष्य निष्फळ होत नाही हे स्वतःला उमजलेले जीवनसार बोरकरांनी  ह्या अप्रतिम रूपकातून मांडले आहे.  केवळ बारा ओळींच्या ह्या कवितेला बोरकरांनी हळूहळू शिखराकडे नेले आहे. जगून झालेल्या जीवनाचे सिंहावलोकन करताना मनात कसलीही खंत नाही; उलटपक्षी त्या पंचत्वात विलीन होण्याची ओढ आहे, अंतिम साध्यही तेच आहे ह्याची त्यांना जाणीव झाली आहे, तीच त्यांनी कवितेत मांडली आहे. 

आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर असणाऱ्याला सफलतेच्या समाधानाची जाणीव करून देणारा, आयुष्याच्या मध्यावर असणाऱ्याला उर्वरित आयुष्यासाठी मार्गदर्शन करणारा आणि आयुष्याचा उभारीने प्रारंभ करणाऱ्यासमोर भौतिकतेपलीकडेही काही साधायचे असते ह्याची जाणीव करून देणारा आदर्श त्यांनी पुढे ठेवला आहे.

प्रत्ययकारी प्रतिभा, अलंकाराचा सोस नसलेल्या सहजसुंदर, प्रासादिक शब्दांचे भांडार बोरकरांकडे आहे. कोणताही आवेश वा अभिनिवेश न आणता, बोधामृत पाजण्याचा फाजील आव न आणता मनाच्या गाभाऱ्यात शिरण्याचे विलक्षण कसब बोरकरांकडे आहे. ही कविता म्हणजे जणू साक्षात बोरकर! स्वतःला सार्थ अभिमानाने ‘पोएट बोरकर’ म्हणणारे, तुमचे आमचे वाटणारे बाकीबाब बोरकर! 

कवीच्या विस्मयकारी प्रतिभेची साक्ष पटवत, अत्यंत समर्पक, साध्या शब्दांच्या मोहपाशात गुंतवून ठेवण्याची शक्ती ह्या लहानशा कवितेत आहे. भोवतालाशी एकरूप होऊन आयुष्य सर्वांगाने जगून झाल्यावर, परमेश्वर नामक अनंताकडे नेणाऱ्या मृत्यूनामक वास्तवाला तृप्त मनाने कसे स्वीकारावे ह्याचा, ही कविता म्हणजे वस्तुपाठच आहे. कविता वाचल्यावर, उदात्त भावनेने ऊर भरून न आला तरच नवल!

बा .भ .बोरकर 

                                                                 *****

                                                                                                  

Author

Leave a Reply