आणिले टिपूनी अमृतकण

‘तुझे जाहले दर्शन

वेडावलो आनंदाने

माझे मला उमगेना

काय मागावे मागणे….

तुझ्या हास्यातून आले

स्वनातीत शब्द काही

ममतेनं म्हणालास

वरं ब्रूहि वरं ब्रूहि….

काय मागू गुरूदेवा

तूच बोल माझ्या मुखे

तुझ्या मुखी आले शब्द

माझ्या मागण्यासारखे….

वेळ साधुनी मिळावी

जठराग्निस आहुती

माझे एकल्या व्यक्तीचे

मागणे ते किती?….

साऱ्या विश्वासाठी द्यावा

गुरूदेवा, एक वर

जीव जीव सुखी व्हावा

स्वर्ग यावा पृथ्वीवर’

— ‘माझे मागणे’ 

ग. दि. माडगूळकर

हे ‘मागणं’ कुणाचं? मराठी चित्रपटसृष्टीच्या एका प्रदीर्घ कालखंडावर आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या सिद्धहस्त कवीचं?

की,

१९४२च्या स्वातंत्र्य चळवळीत लोकांच्या मूक भावनांना शाहिरी कवनांत गुंफणाऱ्या गजानन दिगंबर माडगूळकरांचं?

की, 

गावरान शब्दांना हुरड्याची लज्जत आणणाऱ्या आणि लावणीला मऱ्हाटमोळ्या बाजाचं लावण्य चढवणाऱ्या अवघ्या महाराष्ट्राच्या गदिमांचं?

हे मागणं आहे, मऱ्हाटीच्या आधुनिक वाल्मीकीचं – तुलसीदासांचं रामचरित ‘गीतरामायणा’च्या स्वरूपात मराठी माणसांच्या घराघरात पोहोचवणाऱ्या ग. दि. माडगूळकरांचं.

अनेक रसिकांना अपरिचित असलेली ही कविता आठवायचं कारण, गदिमांनी ‘स्वर्ग यावा पृथ्वीवर’ असं मागणं मागितलं आहे. वेगळ्या अर्थानं आज सकल भारतीय ‘रामराज्य यावं’ अशी मनोकामना व्यक्त करत आहेत. मी हा लेख लिहित असताना घराघरांतून, देवळादेवळांतून प्रभू रामचंद्रांचा जयजयकार मला ऐकू येतोय. ठिकठिकाणी ‘गीतरामायणा’चे कार्यक्रम होत आहेत. श्रोते तल्लीन होऊन ऐकताहेत. मी फारशी श्रद्धावान नाही; पण या वातावरणात, या आनंदाच्या लाटेवर आपणही दोन झोके घेऊन बघावेत असं वाटलं. खरंतर प्रभू रामचंद्र आणि त्यांचं रामायण ही कवि-कल्पना की सत्य घटना? पण मला या गुंत्यात अडकायचं नाही. गदिमांची मात्र श्रीरामांवर अनन्यसाधारण श्रद्धा होती. त्यांनी म्हणून ठेवलंय, “मी गीतरामायण लिहिलं नाही, माझ्याकडून ते लिहिलं गेलं.” श्रीरामांचं दर्शन मला देवळांतून फारसं झालं नाही, मात्र या आधुनिक वाल्मीकींच्या शब्दांतून झालं.

आयुष्याच्या एका वळणावर अनपेक्षितपणे मला माडगूळकर भेटले. या महाकवीचे आणि माझे ऋणानुबंध कुठल्या जन्माचे? ठाऊक नाही. मीच काय, माझ्यासारख्या अनेकांची – मग ते गायक असोत, वादक किंवा निवेदक असोत… अगदी काही संगीतकारांचीही सुरुवात झाली, ती गदिमांचे शब्द सोबतीला घेऊन, नव्हे, त्यांच्या शब्दांचं बोट धरूनच! संगीतकार प्रभाकर जोगांनी चाल दिलेलं पहिलं भावगीत होतं, ‘लपविलास तू हिरवा चाफा…’ या गाण्यानं जोगसाहेबांना संगीतकार म्हणून ओळख मिळाली. गदिमांच्या संदर्भातील चार कार्यक्रमांचं संहिता लेखन आणि निवेदन करण्याची संधी मला मिळाली. ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ (चित्रपटगीतं, संकल्पना कविवर्य सुधीर मोघे’), ‘असा रंगला जोगिया’, ‘दरवळतो पूरिया’ हे दोन कवितांचे कार्यक्रम आणि ‘निवडक गदिमा’ (कवी-गीतकार, गीतरामायणकार, कथालेखक, कथाकथनकार, अभिनेता आणखी कथा-पटकथा-संवाद लेखक). गदिमांनी साहित्यात चौफेर कामगिरी केली आहे; पण चित्रपटांतली गाणी आणि गीतरामायण हीच त्यांची मुख्य ओळख झाली. त्यांच्या शताधिक कविता दुर्लक्षित राहिल्या.

या लेखात मी फक्त कवी-गीतकार माडगूळकरांविषयी सांगणार आहे.

‘ज्ञानदेवीच्या मराठीयेच्या नगरीतून हिंडून

आणिले टिपूनी अमृतकण…’

असं लिहिणाऱ्या या महाकवीची कवितेशी प्रथम ओळख झाली ती कागदावरून नव्हे; तर आईच्या ओव्यांमधून. ‘तुझ्या गीतगंगेतील भरली एक कळशी.’ माडगूळकरांचं बालपण गेलं त्या माडगुळे खेडेगावात देवळातली काकडआरती हाका मारत असायची. रात्री मृदुंगावर थाप पडायची आणि ‘जयजय रामकृष्णहरी’चा जयजयकार व्हायचा. हे संस्कार त्यांच्या गाण्यांमधून, कवितांमधून उमटत राहिले.

‘संसार मी केला

तुळशीचा मळा

करदा सांवळा!

पांडुरंगा… 

बैल होऊनिया

वेद राबताती

निंदणी करीती

श्रुति-स्मृति…’

तर कधी

‘शैव कशाचें? वैष्णव कसले? कसले वेदान्ती?

योगी कसले? हठयोगी तर केवळ मूढमती!

सखी जीवाची जिथे नांदते तीच एक पेठ

देव असो वा नसो, दाविते मोक्षाची वाट….’.

चित्रपट व्यवसायाच्या मार्गानं गदिमांनी आपला प्रवास सुरू केला; पण त्यांचे शब्द प्रथम गायले गेले ते मेळ्यांमधून. पुढे चित्रपट क्षेत्रात उमेदवारी करत असतानाच स्वातंत्र्य चळवळीसाठी ‘गुरूजी’  या टोपणनावानं त्यांनी शाहिरी कवनं लिहिली. शाहीर निकम ती गात असत –

‘नाना पाटील नाही एकला

त्याच्या दिमतीला उभा ठाकला

मर्दांचा सारा सातारा प्रांत

पोलादी संघटना सैन्यात

शेकड्यांनी शस्त्रसिद्धी हातात,,,,

जीऽऽजीजीजी’

एकीकडे शाहिरी कवनं आणि दुसरीकडे ‘पहिला पाळणा’, ‘जयमल्हार’, ‘वंदेमातरम्’, ‘राम जोशी’ अशा चित्रपटांची गाणी गाजत होती. पडद्यावर ‘गीतं – ग. दि. माडगूळकर’ अशी लफ्फेदार अक्षरं उमटू लागली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून गदिमांच्या नावाचा चौघडा वाजू लागला; तरी ते मनात कुठेतरी खूप दुःखी होते. ‘परिस्फोट’ कवितेत गदिमा लिहितात –

‘गीत हवे कां गीत

एका मोले विकतो घ्या रे विरह आणखी प्रीत…’

लहानपणापासून पाहिलेली कलाजीवनाची स्वप्नं सत्यसृष्टीत आणण्यासाठी किंवा वडिलांच्या फाटक्या संसाराला ठिगळं लावायलादेखील  व्यवहाराचा सुईदोरा हाती घ्यावा लागेल हे जीवनातलं कटू सत्य तरुणपणीच उमजलं होतं. ‘जोगिया’ या पहिल्या कवितासंग्रहाच्या सुरुवातीला गदिमांनी लिहिलं आहे, ‘जीवनव्यवसाय म्हणून लेखणीशी अनेकदा बेइमानी करण्याचा प्रसंग मजवर आला – येतो आहे. या संग्रहातील कविता ही मात्र व्रतस्थपणे केलेली काव्यनिर्मिती आहे.”

कविता-गीत असो किंवा गद्यलेखन, गदिमांच्या भाषेचं एका शब्दात वर्णन करायचं; तर ‘चित्रभाषा.’ साध्या साध्या वाक्यांतून, कवितेच्या ओळीतून चित्र उभं करण्याची ताकद त्यांच्या शब्दांत आहे. जणू हाती कॅमेरा घ्यावा आणि वाक्यावाक्याचे ‘शॉट्स’ घ्यावेत. उदा. एका कलावंतिणीचा रंगमहाल – कविता जोगिया

‘कोन्यात झोपली सतार, सरला रंग,

पसरलीं पैंजणे सैल टाकून अंग,

दुमडला गालिचा, तक्के झुकले खालीं

तबकात राहिले देठ, लवंगा साली….’

किंवा ‘भादव्याच्या पावसात’ भिजत असलेल्या फुलबागेचं वर्णन गदिमांनी केलं आहे –

‘भादव्याच्या पावसात

भिजतसे फुलबाग

पानोपानीं निथळती

सुमनांचे अंगराग….

जाग जागून दमली

घेई डोळ्यांवर पाणी

निशीगंधाच्या मेळ्यांत

सुस्तावली रातराणी….

कृष्ण-कमळीच्या वेला

आली फुलें लोचनांची

त्यांच्या सुगंधास छटा

आवरल्या वासनांची

तुझ्या उद्यानाची शोभा

मला आवडे आवडे

परी दृष्टीस रुपती

दोन चंदनाची झाडें

कुलवंतीची सखे या

चार दिवसांची साथ

अंती निरोप देतील

याच चंदनाचे हात.’

असे शब्दप्रभू गदिमा आदर्शाचे पुजारी होते. परंपरा, राष्ट्रप्रेम, आस्तिकतेची आवश्यकता, सांस्कृतिक संचिताची जपणूक… अशा विषयांवर ते पोटतिडिकीनं बोलत असत. कधीकधी ते सारं कवितेतही उमटत असे. महात्मा गांधीजी गेल्यावर त्यांनी लिहिलं होतं –

‘नका थांबवू इथेच दिंडी

कलेवरावर वाहत बुक्का

वैकुंठी हा गेला वैष्णव

भगवी मागे उरे पताका!….

नका थांबवू इथेच दिंडी

या संताची उचला वीणा|

नसो नाहि तर त्याची वाणी

पुढे चालवा याचा बाणा|….’

गदिमांच्या बहुस्पर्शी प्रतिभेची मुळं कुठंकुठं रुजली असावीत असं सर्वसामान्य वाचकाला वाटत असतं. शांताबाई शेळके यांनी त्याविषयी अतिशय समर्पक शब्दांत लिहिलं आहे, ‘रामायण-महाभारतासारख्या महाकाव्यापासून, कालिदास, भवभूतीसारख्या ललित संस्कृत कवींपर्यंत, तसंच संत-पंडित मराठी कवींपासून आधुनिक मराठी कवींपर्यंत, लावण्या-पोवाडे अशा लोकसाहित्यापासून ते शेकडो अनामिक कवयित्रींनी रचलेल्या ओव्यांपर्यंत आणि मीरा-सूर-कबीर अशा हिंदी कवींपासून ते इंग्रजी साहित्यापर्यंत त्यांच्या वाचनाचा मोठा पल्ला होता.’

तर असे हे काहीसे अपरिचित गदिमा. त्यांच्या सर्वपरिचित पैलूंविषयी पुढील लेखात.

Author

One thought on “आणिले टिपूनी अमृतकण

  1. ” शैव कशाचें? वैष्णव कसले? कसले वेदान्ती?

    योगी कसले? हठयोगी तर केवळ मूढमती!

    सखी जीवाची जिथे नांदते तीच एक पेठ

    देव असो वा नसो, दाविते मोक्षाची वाट….’.

    शब्दप्रभू गदिमां ना शतशः प्रणाम !🙏

Leave a Reply