१. शून्य आणि पूर्ण
असते शून्याला काही किंमत, काही अर्थ
व्याख्येनुसार पूर्ण रिते
संपूर्ण अभाव हाच स्वभाव
तरी किती विलक्षण क्रिया-प्रक्रिया
अंकाच्या डावीकडे मांडा : तसुमात्र फरक नाही
उजवीकडे आले की मूल्य दशगुणीत
मिळवा वा वजा करा : मूळ अंक तसाच
गुणाकार : कितीही जटील गणित असो
शून्याने गुणले की उत्तर भोपळा
शून्याने भागा : एकदम अनंताकडे झेप
कोणत्याही संख्येचा शून्य घात : परत एकापासून सुरुवात
पूर्ण असते चराचर कवेत घेऊनही दशांगुळे उरलेले
सर्व त्याच्यात, ते नसते कशात
कोणतीही प्रक्रिया करा
तेच ते परिपूर्ण पूर्ण उरते
शून्य घालते पूर्णालाही गवसणी
शून्य झालो की पूर्ण झालोच
२. अवकाश
सर्वव्यापी
रूप-रंग, शीत-उष्ण, वस्तुमान-शक्ती, कण-तरंग
असे काहीही नसले तरी त्यांचा
दिग्मूढ करणारा सारा पसारा सहज सामावून घेणारे
असते हे सर्वांच्या आत आणि बाहेरही
वस्तू प्रमाणबद्ध असो वा वेडीबागडी
तितकाच अलिप्त स्वीकार
असंख्य आकार पोटात रिचवत स्वतः निराकार
सतत विस्तार पावत असते म्हणे
कशात?
असा अर्थशून्य प्रश्न नसतो विचारायचा
मीही फुरफुरलो
झटू लागलो त्याला आकलण्यासाठी
भल्याभल्यांनी समजावले
आकाशाला मिठी मारण्याचे वेड
भयंकर वाईट
पार वाट लावते
त्याला कवेत घेण्याचे सामर्थ्य असलेला
एखादाच सिद्धार्थ, बाकी व्यर्थ
शहाणे अंथरूण पाहून पाय पसरतात
आपली चौकट आपल्याला साजरी
ती मोडू पाहील तो मोडेल
चार थपडा खाऊन मीही वळणावर आलो
गुंफला कोश स्वतःभोवती
समजूत घातली स्वच्छंद मनाची
अवकाश तर असते सर्वत्र
कोशाच्या आत आणि बाहेरही
आता मी कोशात सुखात आहे
आणि अवकाश निर्विकार
३. काळ
तेज आणि तमाच्या दिनक्रमात करकचून आवळतो तो आपले जीवन
तसा तो पक्का काटेकोर, न्यायी, समदृष्टी
प्रत्येक जीवजंतूच्या दिवसात नेमके समान मोजके क्षण
काहीही करा, निमिषमात्र इकडे तिकडे नाही
असंख्य अपुऱ्या इच्छा
आकांक्षाना फुटलेले विविधरंगी धुमारे
नवनिर्मितीसाठी शिवशिवणारे हात
किंवा जस्ट टाईमपास
उद्योगी असो वा आळशी
काळाची चौकट अढळ
टकरा देऊन हताश होता कळते
झुगारली कितीही बंधने
तोडल्या साऱ्या मर्यादा तरी याच्यापुढे शरणागती ठरलेलीच
कसाही वापरा वा न वापरा, तो निष्ठुरपणे वाहतच असतो
नाही हिशोब मागत तो दिलेल्या चोवीस तासांचा
त्यात काय बसवायचे काय नाही, काय सोडायचे काय धरायचे
अपरिहार्य निर्णय स्थिरपणे अंमलात आणायचे
का अर्ध्यातच शरणागती, हे आपल्या हाती
मात नाही करता येत याच्यावर
पण पुरेपूर कारणी लावून
उरू शकतो आपण, आपला काळ सरल्यावरही

Touched my heart ,as it is a beautiful reality.