वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’: मराठी साहित्यातील ध्रुवतारा

१९७४ मध्ये वि. स. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मराठी मानकरी ठरले. त्यानंतर एक तप उलटून गेल्यावर १९८७ साठी कुसुमाग्रजांना हा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तेव्हा समीक्षक आणि सर्वसाधारण वाचक, सर्वांनाच या निर्णयाचा आनंद झाला. विशेष म्हणजे खांडेकरांना हा पुरस्कार मिळाला त्या वेळी कुसुमाग्रज या सन्मानास पात्र असल्याचे उद्गार त्यांनी काढले होते.
२७ फेब्रुवारी १९१२ रोजी गजानन रंगनाथ शिरवाडकर नावाने पुण्यात जन्मलेले कुसुमाग्रज त्यांच्या चुलत्यांना दत्तक गेल्यावर ‘विष्णु वामन शिरवाडकर’ होऊन नाशिकला स्थलांतरित झाले. तेथूनच बी. ए. झाल्यानंतर दीड-दोन वर्षे त्यांनी चित्रपटांत पटकथा लेखन व अभिनय केला; मात्र तेथे मन रमले नाही म्हणून पुढील १३ वर्षे त्यांनी मुंबई, पुणे आणि नाशिक येथील नवयुग, धनुर्धारी, सारथी, प्रभात आदी नियतकालिकांमध्ये पत्रकार आणि संपादक म्हणून काम केले. याच दरम्यान १९४४ मध्ये त्यांचा विवाह मनोरमा (पूर्वाश्रमीच्या गंगूबाई सोनवणे) यांच्याशी झाला. साध्या आणि शांत स्वभावाच्या मनोरमाबाईंनी घरची जबाबदारी सांभाळत कुसुमाग्रजांना लेखनासाठी पूर्णपणे मोकळे वातावरण दिले. १९४९ मध्ये शिरवाडकर नाशिक येथे स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी कोणतीही सरकारी वा खाजगी नोकरी केली नाही. ते पूर्ण वेळ साहित्यनिर्मिती, सामाजिक कार्य, व्याख्याने, साहित्यिक संस्थांना मार्गदर्शन आणि सांस्कृतिक चळवळी यांत सक्रिय राहिले.
कवी कुसुमाग्रज
कॉलेजमध्ये असतानाच शिरवाडकरांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. गडकऱ्यांच्या ‘गोविंदाग्रज’ टोपणनावाप्रमाणे त्यांनी कुसुम या धाकट्या बहिणीच्या नावावरून ‘कुसुमाग्रज’ हे नाव काव्यलेखनासाठी वापरले. त्यांची स्फूर्तिस्थाने. केशवसुत आणि सावरकर हे मराठी, तर वर्डस्वर्थ आणि शेले हे इंग्रजी कवी ही होती. १९३० मध्ये त्यांनी रविकिरण मंडळाच्या धर्तीवर नाशिकमध्ये ‘ध्रुव मंडळा’ची स्थापना केली. ‘जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९३३ मध्ये या मंडळानेच प्रकाशित केला. त्यांच्या काव्यगुणांनी प्रभावित होऊन वि.स. खांडेकरांनी पुढाकार घेत १९४२ मध्ये ‘विशाखा’ हा त्यांचा कवितासंग्रह स्वतःच्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध केला आणि कुसुमाग्रजांचे नाव आणि ख्याती सर्वत्र पसरली. या संग्रहाने मराठी काव्यजगतात क्रांती घडवून आणली. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात यातील कवितांनी तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली. यानंतर त्यांचे कवितालेखन नियमितपणे सुरूच राहिले.
१९८९ पर्यंत त्यांचे १६ कवितासंग्रह प्रसिद्ध झाले, त्यांमध्ये कालिदासाच्या मेघदूतचा अनुवादही होता.
शिरवाडकरांची साहित्यिक म्हणून प्रामुख्याने ओळख कवी म्हणूनच आहे. स्फूर्तिदायक वैचारिकता, अदम्य विजिगीषुता, विषमतेविरोधात भूमिका, करुणेचा ध्यास ही त्यांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये. त्यांच्या कवितांमधून मराठी भाषेचा डौल, सौंदर्य प्रत्ययास येते. त्यांच्या कवितेतील शब्दरचनांची विविधता आशयानुसार प्रत्ययास येते. नागाच्या फण्याचे वर्णन करताना ‘गर्भरेशमी’ शब्दाच्या परिचित संदर्भांऐवजी एका अनपेक्षित अन्वयात कुसुमाग्रज तो योजतात :
“कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार
प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते”
कुसुमाग्रजांच्या कविता अनेक विषयांना स्पर्श करतात. त्या आत्मनिष्ठ कमी आणि जीवनवादी प्रामुख्याने आहेत. कधी हळुवारपणे, तर कधी थेट धडक देत, कधी विनम्र, लीनतेने तर आवश्यक असेल तेथे उपरोध, नर्म विनोदाचा वापर ते करतात.
देव आणि देवत्वाविषयी लिहिताना या संदर्भातील अनंत छटा त्यांच्या कवितांतून व्यक्त होतात. देव या संकल्पनेबद्दलचा त्यांचा अंतर्प्रवासही विकसित होत गेलेला दिसतो. ते अज्ञेयवादी आहेत.
“ज्यांना देव हवा आहे
त्यांच्यासाठी तो श्वास आहे,
ज्यांना देव नको आहे
त्यांच्यासाठी तो भास आहे,
आस्तिक नास्तिक वादात
मी कधीच पडत नाही,
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काही अडत नाही…”
आणि
देव एखाद्या महारोग्याच्या करुणेने त्याच्याकडे धावून गेला तर –
“महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा
प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल!”
जातिव्यवस्थेत देवाला कोंडणाऱ्या वैचारिकतेविरोधात त्यांची लेखणी अशी सळसळते.
कुसुमाग्रज अनेकदा सामाजिक, राजकीय शोषक वृत्तीवर कोरडे ओढतात. मुसळधार पावसात स्वतःचे एकुलते एक मूल बुडून वाहून गेलेली एक भिकारीण आहे. पण ह्या घटनेचा एवढासाही परिणाम समाजमनावर होत नाही. ‘राजहंस माझा’ कवितेत ते म्हणतात
“बुडू द्या –
मूल बुडले म्हणजे सचिवालय
पाच ताऱ्यांचे ताजमहाल
अथवा ब्रेबॉर्न स्टेडीयम
बुडाले नाही”
कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला ध्यासवृत्तीने आपले जीवन समर्पित करणाऱ्या ‘महानायकां’चे वेड आहे. नव्या भूमीच्या शोधात निघालेला कोलंबस, भारतीय राजकारण, समाजकारण आणि शिक्षणक्षेत्रात लोकोत्तर कार्य करणारे लोकमान्य टिळक, दुर्दम्य पराक्रम गाजवणारे शिवाजी महाराज, महान समाजसुधारक ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, केशवसुत, सैगल अशा अनेक उत्तुंग व्यक्तींची महानता ते अतीव लीनतेने सादर करतात. त्याच वेळी, या महापुरुषांना आपल्या संकुचित डबक्यातला ‘महान बेडूक’ केलं जातं, याच्या दुःखातून ते म्हणतात,
“महापुरुषांना मरण असते
दोनदा,
एकदा वैऱ्याकडून
आणि नंतर भक्तांकडून”
बाबा आमट्यांसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याची परमोच्चता ते पुढील शब्दांत व्यक्त करतात :
“पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात
माणसांपर्यंत पोचवणारा तू –”
कुसुमाग्रज प्रेम विषयावरील कवितांमधून एका वेगळ्याच पातळीवर व्यक्त होतात. ‘पृथ्वीचे प्रेमगीत,’ ‘प्रेम कुणावरही करावे,’ ‘प्रेम कर भिल्लासारखं,’ यांसारख्या कवितांमधील प्रेमभावना अमूर्त स्वरूपात व्यक्त होते.
कुसुमाग्रज म्हटले, की त्यांच्या असंख्य कविता डोळ्यांसमोर येतात – ‘गर्जा जयजयकार,’ ‘कोलंबसाचे गर्वगीत,’ ‘कणा,’ ‘निळा पक्षी,’ ‘अहि-नकुल,’ ‘आगगाडी आणि जमीन,’ ‘सात,’ ‘काही बोलायाचे आहे,’ ‘अखेर कमाई’…
किती नावे घ्यावीत?
कुसुमाग्रजांच्या कविताविश्वाबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी गुलजार यांनादेखील कुसुमाग्रजांच्या काव्याची भुरळ पडली आहे. कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांचा त्यांनी हिंदीत अनुवाद केला आहे.
कवितालेखनासह शिरवाडकरांचे कथा, कादंबरी, ललित निबंध आणि समीक्षा लेखनही सुरू होते. जवळपास ५० कथांचे ६ संग्रह त्यांच्या नावावर आहेत. ‘वैष्णव,’ ‘जान्हवी’ आणि ‘कल्पनेच्या तीरावर,’ अशा तीन कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. काही ललित आणि समीक्षात्मक निबंधदेखील त्यांनी लिहिले. नाट्यक्षेत्रातील त्यांची कामगिरी भरीव आहे – त्यांनी १८ नाटके आणि काही एकांकिका लिहिल्या. खांडेकरांनी त्यांना केवळ कविता आणि नाट्यलेखनावरच लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. शिरवाडकरांनी तो बऱ्याच प्रमाणात मानला.
नाटककार शिरवाडकर
चित्रपट कंपनीत काम करत असताना शिरवाडकरांनी फ्रेंच नाटककार मोलियर याच्या ‘मायझर’वर आधारित ‘काकासाहेब’ नावाचे नाटक लिहिले होते; मात्र ते नाटक रंगभूमीवर आले नाही व आता त्याचा मागमूसही नाही. (याच मूळ नाटकाचे आचार्य अत्रे यांनी ‘कवडीचुंबक’ नावाने केलेले रूपांतर त्यानंतर १५ वर्षांनी रंगभूमीवर येऊन बऱ्यापैकी यशस्वीदेखील झाले.) यानंतर शिरवाडकर नाटक लेखनाकडे वळले ते डॉ. भालेरावांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे. ऑस्कर वाइल्डच्या ‘An Ideal Husband’ या नाटकाने शिरवाडकर प्रभावित झाले. अनीती हा गुन्हा नाही, पण ती उघडकीस येणे हेच उच्चभ्रू समाजात पाप ठरते अशी मध्यवर्ती कल्पना असलेल्या या नाटकाचे शिरवाडकरांनी ‘दूरचे दिवे’ नावाने स्वैर रूपांतर केले – त्यास मराठीपण प्राप्त करून दिले. एकांतिक आदर्श हे दूरच्या दिव्यांप्रमाणे असतात, त्यांच्या प्रकाशात जीवनाचा मार्ग क्रमायचा असतो; मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचणे माणसाला तसे अशक्यच असते याचे भान ठेवायला हवे, अशा स्वरूपाचे चिंतन या नाटकातून व्यक्त होते. या नाटकापाठोपाठ ‘दुसरा पेशवा’ ही बाजीरावाच्या मस्तानीवरील प्रेमामुळे आप्त आणि समाजाशी झालेल्या संघर्षावरील शोकांतिका १९४७ मध्ये रंगमंचावर आली. बेल्जिअन नाटककार मेटरलिंकच्या ‘मोना वान्ना’ या शोकांतिकेचे रूपांतर शिरवाडकरांनी ‘वैजयंती’ नावाने केले, ते १९५० मध्ये सादर झाले.
शिरवाडकरांना शोकात्मक कथावस्तूंचे आकर्षण होते. त्यांची बरीचशी नाटके शोकांतिकाच आहेत. संघासाठी त्यांनी लिहिलेले अखेरचे नाटक म्हणजे महाभारतातील कर्णाच्या जीवनावरील ‘कौंतेय.’ ते लिहिताना शिरवाडकरांनी संपूर्णपणे कर्णाच्या बाजूने, पर्यायाने कौरवांच्यादेखील बाजूने विचार केल्याने या शोकांतिकेवर अनेक आक्षेप आणि टीका झाली. शिरवाडकरांची या बाबतीतली भूमिका होती : ‘इतिहास-पुराणातील फक्त स्थूल घटनांशी नाटककार बांधलेला असतो…त्यातली स्वभावने स्वतःच्या अन्वयाने उभी करण्याचा नाटककाराला अधिकार असतो”.
शिरवाडकरांनी पुढील ३५ वर्षांत लिहिलेल्या १३ नाटकांमध्ये शेक्सपियरच्या ‘Macbeth’चे रूपांतर ‘राजमुकुट,’ ‘Othello’चे त्याच नावाने, मात्र पात्रांना भारतीय नावे देऊन केलेले रूपांतर, त्याचप्रमाणे Jean Anouiih लिखित ‘बेकेट’चे त्याच नावाने केलेले रूपांतर व तीच मध्यवर्ती कल्पना ठेवून लिहिलेले ‘महंत’ ही दोन नाटके आहेत. तसेच, Tolstoy च्या ‘रिसरेक्शन’ कादंबरीचे कथाबीज मनात ठेवून वेगळ्या अंगाने लिहिलेले ‘चंद्र जिथे उगवत नाही’ आणि Chaplin च्या ‘सिटी लाईट्स’ची स्फूर्ती घेऊन मात्र संपूर्णपणे वेगळी कथा असलेले ‘विदूषक’ हीदेखील आहेत. ‘आमचं नाव बाबुराव’ हे त्यांचे एकमेव प्रहसनात्मक विनोदी नाटक.
शिरवाडकरांना संगीत नाटक हे मराठी रंगभूमीचे मोठे वैशिष्ट्य वाटे. त्या परंपरेतील ‘ययाती आणि देवयानी’ हे नाटक त्यांनी लिहिले. प्रभावी नाट्यलेखन आणि अभिषेकींचे उत्कृष्ट संगीत यांमुळे हे नाटक अतिशय यशस्वी ठरले. त्या पाठोपाठ राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्यावर आधारित ‘वीज म्हणाली धरतीला’ हे त्यांचे संगीत नाटक मात्र त्याची संथ गती आणि तुलनेने कमी परिणामकारक संगीत यांमुळे प्रेक्षकांच्या मनाची पकड घेऊ शकले नाही.
‘वीज म्हणाली…’ नंतर लगेच आलेल्या ‘नटसम्राट’ने शिरवाडकरांचे नाव नाटककार म्हणून अजरामर केले. एकीकडे शेक्सपियरचे ‘किंग लियर’ तर दुसरीकडे नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक यांचे व्यक्तिमत्त्व यांतून स्वतंत्र प्रतिभेचे नाटक जन्माला आले. ते रंगभूमीवर प्रचंड गाजले. श्रीराम लागूंनी जिवंत केलेली गणपतराव बेलवलकरांची भूमिका नंतरच्या काळात दत्ता भट, सतीश दुभाषी, यशवंत दत्त अशा अनेकांनी आव्हान म्हणून साकारली. १९७४ चा साहित्य अकादमी पुरस्कार या नाटकासाठी तात्यासाहेबांना मिळाला.
तेंडुलकर, खानोलकर यांची ‘नवनाट्ये’ कानेटकर, दळवी यांची व्यावसायिक नाटके रंगभूमीवर येत असताना ‘कोल्हटकर -गडकरी – खाडिलकर’ नाट्यपरंपरेला कालानुरूप बळ शिरवाडकरांनी पुरविले. साहित्यिक गुणवत्ता हा चांगल्या नाटकाचा पहिला निकष असल्याचे ते मानत असत. त्यांच्या नाटकांमध्ये त्यांच्या काव्यभाषेचे दर्शन स्वाभाविकपणेच घडते. त्यांची बहुतांश नाटके ही व्यक्तिकेंद्री आहेत. बाजीराव पेशवे, राणी लक्ष्मीबाई, कर्ण अशा असामान्य व्यक्तिमत्त्वांसोबतच समाजातील सामान्य माणूस हादेखील त्यांच्या मनातील हळवा कोपरा होता. सामान्य माणसाला विशिष्ट प्रसंगी गवसलेला स्वतःमधील असामान्यत्वाचा शोध हा आशय त्यांच्या काही नाटकांमधून समोर येतो.
“नाटक सापडणे म्हणजे कथा सापडणे नव्हे, तर तिच्या उगमस्थानी आलेली माणसे सापडणे,” अशी शिरवाडकरांची भूमिका होती त्यामुळे त्यांच्या नाटकांतून सशक्त व्यक्तिरेखा उभ्या राहतात. मात्र कथानकाच्या बांधणीकडे ते पुरेसे लक्ष पुरवीत नसल्याने ते ठिसूळ राहते. कधी एकाच व्यक्तिरेखेवर लक्ष केंद्रित होऊन अन्य व्यक्तिरेखा फिक्या राहतात, एकूण तोल बिघडतो. असे असले तरी त्यांची प्रतिभा आणि अलौकिक कल्पनाशक्ती यांमुळे त्यांची प्रत्येक कलाकृती कोणत्या ना कोणत्या प्रकारे लक्षणीय ठरते.
कुसुमाग्रजांच्या दीर्घ आणि असामान्य साहित्यसेवेमुळे त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. १९६४ च्या मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९८६मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना मानद ‘डी.लिट’ पदवी दिली. १९९१ मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण’ने त्यांना गौरविले. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा होतो. (महाराष्ट्रभूषण हा सन्मान त्यांच्या वाट्याला आला नाही याचे सखेद आश्चर्य वाटते.)
अर्थात, एक साहित्यिक म्हणून १९८७ साठीचा ज्ञानपीठ पुरस्कार सर्वाधिक महत्त्वाचा म्हणावा लागेल. ११ मार्च १९८९ रोजी झालेल्या समारंभात पुरस्कारासोबतच्या सन्मानपत्रातील काही अंश पुढीलप्रमाणे –
“कुसुमाग्रज नावाने लोकप्रिय असलेल्या शिरवाडकरांचे मराठी काव्य आणि नाटक या साहित्यप्रकारातील योगदान अमूल्य आहे… ‘जीवनलहरी’पासून ‘मुक्तायन’ पर्यंतचा त्यांचा काव्यप्रवास अत्यंत भव्य स्वरूपाचा आहे – चिंतनाच्या क्षेत्रात अत्यंत उच्च पातळीवर पोहोचलेले शिरवाडकर प्रकृती आणि प्रणय यांच्या सूक्ष्म चित्रणाबरोबर सामाजिक जीवनातील अन्याय, असमानता तसेच अत्याचार यांतून निर्माण झालेल्या द्वंद्वाचे चित्रण करतात… त्यांच्या नाटकांच्या केंद्रस्थानी बाजीराव, झाशीची राणी, ययाती, बेलवलकर यांसारखी नियती आणि परिस्थितीशी संघर्ष करणारी व्यक्तित्वे असतात.”
कुसुमाग्रजांच्या पुरस्कार स्वीकाराच्या भाषणातील काही भाग –
“काव्याची वा एकूण सर्वच साहित्याची निर्मिती ही नदीच्या उगमाप्रमाणे एक नैसर्गिक आणि निरपेक्ष घटना असते… नदीप्रमाणेच आत्मतेची शीव ओलांडून ते (साहित्य) लोकजीवनात प्रवेश करते… हा गौरव माझ्या मायभाषेचा, जिच्या खांद्यावर मी उभा आहे त्या साहित्यिक परंपरेचा आणि ज्यांच्या हातात हात घालून मी आज प्रवास करणार आहे, त्या समकालीन साहित्यिकांचाही आहे.”
कुसुमाग्रज स्वभावतः एकांतप्रिय होते. प्रथमदर्शनी ते अबोलच भासत. स्वतः बोलण्यापेक्षा दुसऱ्याचे बोलणे ऐकणे त्यांना पसंत होते. केवळ नाशिकमधीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे ते आदरस्थान होते.
१० मार्च १९९९ रोजी कुसुमाग्रजांनी नाशिक येथे अंतिम श्वास घेतला. मात्र त्या आधीच, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्तीनंतर लगेचच, त्यांच्या प्रेरणेने ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची स्थापना झाली. हे प्रतिष्ठान नाशिकमधील एक प्रमुख सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले आहे. आदिवासी भागातील मुलांसाठी ग्रंथालये सुरू करणे, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देणे असे उपक्रम प्रतिष्ठानातर्फे राबविले जातात. प्रतिष्ठानाकडून ‘जनस्थान पुरस्कार’ आणि ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ एक वर्षाआड दिले जातात. ते अनुक्रमे मराठी साहित्यातील उल्लेखनीय कामगिरीसाठी आणि लोकसेवा, विज्ञान, संगीत/नृत्य, नाट्य/चित्रपट, चित्रकला, साहस/क्रीडा या क्षेत्रांतील उत्कृष्ट कामासाठी दिले जातात. मराठी साहित्याचा उच्च स्तरावर अभ्यास व्हावा या उद्देशाने १९९६ पासून प्रतिष्ठानातर्फे ‘साहित्य – भूषण’ परीक्षा घेतली जाते. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तिघांना सन्मानपत्र आणि पुरस्कार दिला जातो. कुसुमाग्रजांचे साहित्य आणि प्रतिष्ठानाच्या विविध उपक्रमांद्वारे त्यांची स्मृती सदैव जागी राहील. ध्रुवताऱ्याप्रमाणे त्यांचे मराठी जनमानसातले स्थान अढळच असेल.
(संदर्भ: ज्ञानपीठ त्रिमूर्ती – ले. अनिल बळेल, सूर्यपूजक कुसुमाग्रज – ले. प्रवीण दवणे,
वि. वा. शिरवाडकरांच्या नाट्यलेखनाचा शोध-अभ्यास – ले. द. दि. पुंडे)
