पुनरपि जननं : भाग १७

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. 

ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :

हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली.  तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल. 

एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल. 

जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’  या नावाने केले आहे. हे भाषांतर   क्रमशः देत आहोत. या अंकात वाचू या प्रकरण सतरावे .  

 – संपादक

वादळ

सतत वाजणाऱ्या, धोक्याचा इशारा देणाऱ्या बीप बीप आवाजाने मी खाड्कन जागी होते. काही वेळापासून माझं मन मला पडत असलेल्या गुंतागुंतीच्या स्वप्नात हा आवाज विणायचा प्रयत्न करतं आहे. आता माझ्या लक्षात येतं, की एका लाल दिव्याचा झोत माझ्या चेहऱ्यावर उघडझाप करतो आहे. तरीही, एका अनोळखी ग्रहावर उडत असणाऱ्या विमानात मी एकटी झोपलेली आहे आणि कुठल्यातरी अज्ञात संकटात आहे हे लक्षात यायला माझ्या मेंदूला पूर्ण तीस सेकंद लागतात. विमान चालवत एकटीने मोहिमेवर आलेल्या प्रशिक्षित वैमानिकाच्या दृष्टीने प्रतिक्रिया देण्यास तीस सेकंद म्हणजे फारच उशीर झाला. 

सर्वात पहिल्यांदा  विमान कोणत्या उंचीवरून उडत आहे ते मी तपासते. अजूनही मी निर्दिष्ट ३२,००० फुटांच्या उंचीवरून उडत आहे. मी प्राणवायूचा साठा तपासते. तोही पुरेसा आहे. इंजिनदेखील व्यवस्थित काम करत आहे. मग मी विमानाचा संगणक चालू करते. त्याने केलेलं विश्लेषण पाहून माझं आधीच धडधडणारं हृदय थाडथाड उडू लागतं. मी सरळ एका प्रचंड चक्रीवादळाच्या केंद्राच्या दिशेने वेगाने जाते आहे. विमानाचं नेमकं स्थान कळण्यासाठी आकडेमोड करेपर्यंत वादळाच्या शेपटीचा तडाखा बसून विमान वाकडंतिकडं व्हायला लागलं आहे. मला तातडीने दिशा बदलायला हवी. विमान दुसरीकडे वळवायला हवं. डोळ्याचं पातं लवतं न लवतं इतक्यात मी विमानाची स्वयंचलित यंत्रणा बंद करून स्वतः ताबा घेते आणि विमान ईशान्येकडे  – गोल घुमणाऱ्या झंझावातापासून दूर वळवते. वाऱ्याचे जोरदार झोत आणि हवेचा दबाव यांच्याशी मी झगडते आहे. सिम्युलेटरवर शिकलेल्या सूचना आठवायचा प्रयत्न करण्यासाठी माझं मन धावत आहे. विमानाच्या दिशेचा कोन आणखी थोडा वाढवून मी वाऱ्याशी झुंज देण्याचा प्रयत्न करते आणि तीन मिनिटं धडपड केल्यावर माझं विमान शेवटी चक्राकार फिरणाऱ्या वाऱ्याच्या कचाट्यातून बाहेर पडतं. वादळाच्या शेपटापासून वाचण्यासाठी मी किंचित ईशान्य दिशेला जात राहते.

मला मन शांत ठेवायला हवं… शांत ठेवायला हवं… पुढे जात राहायला हवं… चित्त एकाग्र करायला हवं… मी पुन्हा पुन्हा स्वतःला बजावते. माझे हात अजूनही थरथर कापत आहेत… मला खूप तहान लागली आहे पण आसनावरून उठून पाण्याचा घोट घेण्याचीही शक्ती माझ्यात उरलेली नाही. भीतीने माझ्या घशाला  कोरड पडली आहे. मी सातत्याने विमान चालवत राहते आणि पंचेचाळीस मिनिटं असं उडत राहिल्यावर माझं विमान पुन्हा एकदा शांत वातावरणात सफाईदारपणे पुढे जाऊ लागतं. माझ्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास पूर्ववत सामान्य झाला आहे. मी कोणीकडे चालले आहे ते बघायला आता मी नकाशा पाहू शकते. चिलीच्या तळावर अजून रात्र आहे म्हणून मी फक्त माझे बदललेले अक्षांश रेखांश तिथल्या पथकाला पाठवते. मग मी माझ्या स्वतःच्या पथकाला फोन लावते. माझा फोन प्रयोगशाळेत लागतो आणि ॲग्नॉन उचलतो. 

“हाय आरुषी! कुठपर्यंत पोचलीस?”

मी संकटातून नुकतीच वाचले आहे आणि त्याचा आवाज मला आश्वस्त करतो. 

“ॲग्नॉन, मी थोडी अडचणीत सापडले आहे. एका वादळामुळे मला माझा मार्ग बदलावा लागला आहे.” 

मी त्याला सगळा तपशील सांगते. त्याला काळजी वाटते. 

“आरुषी, ताऱ्यांचा प्रकाश शोषणाऱ्या तबकड्यांची स्थिती तपासावी लागेल. जर वाऱ्यामुळे त्यांना क्षति पोचली असेल तर तुझ्या विमानाचा ऊर्जेचा स्रोत कमी होईल. शक्य तितक्या लवकर खाली उतरून तू तपासणी करून ऊर्जेचा स्रोत पूर्ववत करून पुन्हा उड्डाण करावंस.”

त्याचं बरोबर आहे. मी जरी माझ्या घरच्या तळाच्या जवळ पोचले असले तरी अजून एक तासापेक्षा जास्त प्रवास बाकी आहे. मी खाली उतरण्याची प्रक्रिया सुरू करते. विमान जेव्हा खाली येऊ लागतं तेव्हा मी विमानातल्या संगणकावर नकाशा बघत विमान उतरवण्यासाठी योग्य अशी जागा शोधू लागते. मला एक जागा सापडते आणि विमान उतरवण्याची प्रक्रिया स्वयंचलित यंत्रणेवर सोपवावी लागलीच तर त्यासाठी तयारी म्हणून मी त्या यंत्रणेला सूचना देऊन ठेवते. पण विमानावरचं नियंत्रण सोडून देण्याइतकं माझं मन स्थिर नाही. मी एका अनोळखी ग्रहावर, एका अनोळखी प्रदेशात आहे. अशा परिस्थितीचा सराव आम्ही सिम्युलेटरवर कधीच केलेला नाही. 

मनात येणाऱ्या हजार गोष्टींची चिंता करत असतानाच त्या अचानक माझ्या दृष्टिपथात येतात… हिमालय पर्वताच्या उत्तुंग रांगा! जमिनीवरून प्रचंड उंचावर झेपावलेली अनेक शिखरं मला दिसतात… जणू मला आलिंगन द्यायला पृथ्वी वर उसळून आली असावी. त्यांची उंची विस्मयकारक आहे. मी त्यांच्याबद्दल वाचलं आहे आणि पूर्वी त्यांचा अभ्यास केला आहे; पण त्याचं प्रत्यक्ष दर्शन विश्वास बसणार नाही असं मती गुंग करणारं आहे. पर्वताच्या एकापाठोपाठ एक रांगांतून शिखरं शांतपणे ढगांच्याही वर डोकावत आहेत. हिमालयाच्या प्रचंड शिखरांनी वेढलेल्या आणि हिरव्यागार झाडीने आणि कुरणांनी नटलेल्या एका खोऱ्यात माझं विमान झेपावत उतरतं. 

एका कुरणावर विमान उतरतं आणि विस्मयाने उतावीळ होऊन मी बाहेर येते. माझ्या उत्सुकतेने सावधगिरीवर मात केली आहे आणि विमान खाली उतरल्यानंतर पाचच मिनिटांत मी फुगा माझ्या डोक्यावर ओढून घेऊन विमानातून खालच्या हिरव्यागार जमिनीवर उडी मारून आले आहे. यापूर्वी मी कधीही पाहिलेलं नाही असं भोवतालचं दृश्य आहे. त्या भव्य पर्वतांच्या आणि निसर्गाच्या सौंदर्याने माझ्या मनाला भुरळ पाडली आहे. माझ्या सभोवती हिरव्यागार टेकड्या आहेत पण त्यांच्याही पलीकडे बर्फाच्छादित शिखरं डोकावत आहेत. इथं निस्सीम शांतता आहे आणि मला वाटू लागतं, की ती उत्तुंग शिखरं माझ्याशी बोलताहेत. पाच हजार वर्षं त्यांनी पाहिलेला मानवाचा इतिहास मला सांगताहेत. 

हिमालयातील खोऱ्यांमध्ये पाण्यावरून झालेल्या काही लढाया सुरू झाल्या होत्या. अखेरच्या युद्धातील सुरुवातीच्या लढाया होत्या त्या. पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान वाढल्यामुळे आणि बेजबाबदारपणे केलेल्या जंगलतोडीमुळे तिसाव्या शतकाच्या शेवटी हिमालयातल्या हिमनद्या झपाट्याने आटायला लागल्या. भारताच्या भूखंडातल्या ज्या नद्यांचा उगम या हिमनद्यांतून होतो त्यांचं पाणी त्यामुळे कमी होऊ लागलं. जे कोट्यवधी लोक या नद्यांवर अवलंबून होते त्यांना या पाण्याच्या तुटवड्याचा पहिला फटका बसला. नद्या सुकायला लागल्या आणि मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहात बदल झाल्याने त्यांची पाण्यासाठी आसुसलेली शेतं पीक काढण्यासाठी निरुपयोगी झाली. पाण्यासाठी लढाया नद्यांच्या काठावरच्या सपाट प्रदेशात सुरू झाल्या पण हळूहळू नद्यांच्या उगमाच्या प्रदेशात पसरल्या. चाळिसाव्या शतकाच्या शेवटी, एके काळी दाटीवाटीने वसलेली हिमालयातली खोरी ओस पडली. 

हा सगळा इतिहास आठवत असताना मी चहूबाजूंना बघते. आजूबाजूच्या वनश्रीचं सौंदर्य बघून असं वाटतं आहे, की निसर्गाने हिमालयाच्या कुशीत दडलेल्या दऱ्याखोऱ्यांचं वैभव पुन्हा मिळवलं आहे.

कुठल्याही दिशेला पहिलं तरी मला निसर्गाच्या सौंदर्याची लयलूट दिसते आहे. युद्धाच्या विध्वंसक वर्षांची भरपाई करण्यासाठी जणू जीवनाची – निदान वनस्पती सृष्टीतल्या जीवनाची – हिरिरीने भरभराट होते आहे. 

पर्वत आकाशात उंच गेले आहेत. मी जिथे आहे तिथून मला एकामागोमाग एक डोंगराच्या रांगा दिसत आहेत – प्रत्येक रांग तिच्या आधीच्या रांगेपेक्षा उंच. स्वर्गावरच्या डोंगरांच्या तुलनेत हा पर्वत महाकाय आहे. ज्या टेकडीवर मी आई आणि पपाबरोबर रविअस्त बघायला जायचे ती टेकडी यांच्या तुलनेत केवळ एक खेळणं वाटते आहे. त्यांच्या प्रचंड आकाराची मला भीती वाटते आहे आणि तरीही ते सुंदर आहेत.   

मोठ्या कष्टाने मी माझ्या आवतीभोवतीच्या हिरवळीवरून दृष्टी काढून घेऊन ताऱ्यांचा प्रकाश ग्रहण करणाऱ्या तबकड्या तपासण्यासाठी माझ्या विमानाकडे परत जाते. मी काळजीपूर्वक त्यांचं परीक्षण करते आणि त्यांना काही गंभीर इजा झालेली नाही अशा निष्कर्षावर पोचते. तरीदेखील, या डोंगरांच्या रमणीयतेने मी इतकी भारावून गेले आहे, की मी रात्र इथेच काढायची ठरवते. सकाळी निघून तासाभरात मला घरी पोचता येईल असा मनात विचार करते. माझ्या पथकाला फोन करून मी तसं कळवते. 

मी किरणोत्सर्गाची मात्रा तपासते आणि माझ्या अंदाजाप्रमाणे तो खूप कमी असलेला आढळतो. किरणोत्सर्गाची मात्रा अधिक असती तर इथे इतकं दाट अरण्य वाढलं नसतं. माझ्या फुग्यातून बाहेर येऊन मी आकाशात घिरट्या घालू लागते. माझं विमान मी कायम नजरेच्या टप्प्यात ठेवते. कितीही अंतरावरून माझ्या कॉमला त्याची जागा जरी शोधता येत असली तरी या अनोळखी प्रदेशात मी उगाचच काही धोका पत्करणार नाही. 

तीन तास उडण्यात आणि भटकण्यात घालवल्यावर माझा आत्मविश्वास वाढतो. उडताना मला विमानाच्या पूर्वेला एक मोठा तलाव दिसला आहे. हा तलाव दक्षिणेकडे असलेल्या माझ्या पथकाच्या तळावर असलेल्या तलावासारखाच आहे का हे प्रत्यक्ष जाऊन पाहून येण्याची मला उत्सुकता आहे. विमानाकडे उडत जाऊन मी माझी संरक्षणाची पिशवी उचलते. विमानापासून एकटीने दूर जाताना ही पिशवी कायम जवळ बाळगण्याचं आम्हांला प्रशिक्षण दिलेलं आहे, पण तिची गरज पडेल असं काही मला वाटत नाही. 

मी तळ्याच्या दिशेने उडत जाते आणि जवळ पोचल्यावर त्याचा आवाका माझ्या ध्यानात येतो. विमानाजवळ माझ्या स्थानावरून मला त्याचा फक्त एक अंश दिसला होता पण त्याचा मोठा भाग टेकडीच्या मागे लपला होता. टेकडीला वळसा घालून मी तलावाच्या पलीकडच्या काठाच्या दिशेने उडत जाते. या तळ्याच्या पाण्यात अनेक वनस्पती उगवलेल्या आहेत. पसरट गोलाकार पानांच्या मधून मोठी गुलाबी फुलं उमललेली आहेत. दक्षिणेकडच्या तलावापेक्षा हे खूप मोठं असलं तरी तिथल्या तलावाइतकं हे चमकदार नाही. मी काठावर उतरते आणि त्याच्या स्तब्ध पाण्याकडे पाहत बराच वेळ बसून राहते.

पण संध्याकाळ होता होता मला वातावरणात काहीतरी सूक्ष्म फरक जाणवू लागतो. तिथली नीरव शांतता भयाण वाटू लागते. तसं का वाटायला लागतं हे मी सांगू शकत नाही. वेळेचा मला फारसा अंदाज नाही पण अजून ताऱ्याचा अस्त होण्याची वेळ झालेली नाही हे मला माहीत आहे. मग हे असं भर्रकन अंधारून का येत आहे? त्या शांत दरीत मला अधिकाधिक अस्वस्थ वाटू लागतं. मला माझ्या सुरक्षिततेसाठी विमानात परतायला हवं पण स्पष्टपणे जाणवणाऱ्या वातावरणातील बदलामुळे मला भूल पडली आहे. डोंगर तसेच आहेत, तळं तसंच आहे, त्याच्या काठाला वाढलेली हजारो झाडंही तशीच आहेत…आणि तरीही, गेल्या दोन तासांत या जागेवर काहीतरी सावट आलं आहे. आजूबाजूचा निसर्ग काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, पण मला नीटसं कळत नाहीये. 

नैऋत्येकडून थंडगार वाऱ्याच्या झुळुका येऊ लागतात आणि माझे पंख विस्कटू लागतात. दहा मिनिटांत वाऱ्याचा जोर वाढतो आणि तो झाडांमध्ये शीळ घालू लागतो. मी माझ्या फुग्यात शिरते; पण उडत गेल्यावर केवळ दहा मिनिटांच्या अंतरावर माझं विमान आहे हे माहीत असल्याने मी तळ्याच्या काठावर बसून राहते. पण मग अचानक वाऱ्याच्या एका जोरदार झोताने मी जवळजवळ कलंडतेच. पाठोपाठ लगेचच दुसरा झोत येतो आणि थोड्याच वेळात जोरदार वारा एकसारखा माझ्या चेहऱ्यावर आपटू लागतो. मी वर आकाशाकडे पाहते आणि मला पश्चिमेला आभाळ भरून येत असलेलं दिसतं. माझे पाय लटलट कापू लागतात. विजेचा लोळ चमकून जावा तसा माझ्या डोक्यात प्रकाश पडतो, की या वादळात मला उडता येणार नाही. तळ्याच्या काठावरून चालत टेकडीला वळसा घालायला पृथ्वीच्या दमवून टाकणाऱ्या गुरुत्वाकर्षणामुळे अनेक तास लागतील. वादळाचा जोर आणि वेग वाढतो आहे आणि माझ्यापेक्षा दसपटीने उंच असणाऱ्या वृक्षांनी आणि आकाशाला भिडलेल्या डोंगरांनी वेढलेल्या एका विस्तीर्ण तलावाच्या काठावर मी एकटी आहे.

माझ्या फुग्यातूनही वाऱ्याचा जोर मला जाणवतो आहे. मी इथून हललं पाहिजे, कुठेतरी निवारा शोधला पाहिजे… आणि घाबरून जाता कामा नये. ते सर्वात महत्त्वाचं. “घाबरू नको!” मी स्वतःलाच ओरडून बजावते आणि मग मी पळायला लागते. माझे पाय दुखू लागतात आणि पावसाचे पहिले थेंब माझ्या चेहऱ्यावर आपटताच मी ठेचकाळून पडते. पुन्हा उठून मी पळू लागते आणि शरीर पुढे ढकलण्यासाठी माझे पंख फडफडावयाचा प्रयत्न करते. पण विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याचा जोर माझी शक्ती शोषून घेतो. मी पंख मिटून घेते आणि सगळी शक्ती पायांत एकवटून पळू लागते. तळ्याच्या काठापासून टेकडीपर्यंतचं अंतर पार करायला जणू अनंत काळ लागतो. निदान इथे वाऱ्याच्या वेगापासून मी अंशतः झाकली गेले आहे. झाडं आता धोकादायक रितीने हलताहेत आणि पाऊस मुसळधार पडतो आहे. वर पाहिल्यावर मला फक्त एक गोल फिरणारं हिरवं छत दिसतं आणि आकाशात प्रचंड उंचावरून पडणाऱ्या पावसाच्या धारा. जमिनीवर चिखल होत आहे आणि मी सारखी पाय घसरून पडते. फुगा सारखा माझ्या डोक्यावरून घसरत राहतो. 

त्या गोंधळात माझं दिशांचं भान हरपतं आणि आपण पळायचं आहे एवढंच मला कळतं. जणू काही निसर्गाच्या या रौद्र रूपापासून मला पळून जाता येणार आहे…  आणि मग अचानक बाजूच्या डोंगराच्या कड्यात मला एक मोठी गुहा दिसते. प्रतिक्षिप्त क्रियेने पाठीवर पडणाऱ्या पावसापासून बचाव करण्यासाठी मी वाकून त्या दगडी छताखाली आडोशाला उभी राहते. चेहऱ्यावरून ओघळणारंय पाणी मी पुसून टाकते. माझे केस आणि पंख पाण्याने थबथबून माझ्या पाठीला चिकटले आहेत. मी आजूबाजूला पाहते आणि माझ्या लक्षात येतं, की गुहेच्या दारातून एक चिंचोळी वाट आत जाते आहे. वादळापासून सुरक्षित वाटू लागल्याने मी सावधपणे त्या वाटेवरून पुढे जाऊ लागते. आपण अज्ञात ठिकाणी जातो आहोत हे कुठेतरी मनाला जाणवतं आहे. थोड्या वेळाने ती वाट रुंद होते आणि एका मोठ्या विवरात तिचं रूपांतर होतं. आणखी पुढे जाण्याचा मला धीर होत नाही आणि मी चिंचोळ्या वाटेकडे परत येते. इथून मला बाहेर घुमणाऱ्या वाऱ्याचा आवाज येतो आहे आणि पावसाचा मारा होत असलेल्या तळ्याचा थोडा भाग दिसतो आहे. बाहेर खूप अंधारून आल्याने दृश्य अंधुक झालं आहे. तळ्याचा काठ किंवा दूरवरचे डोंगर मला नीट दिसत नाहीत. सगळं दृश्यच पाणी आणि वारा यांत मिसळून गेलं आहे.

गुहेच्या भिंतीला पाठ टेकून मी तिच्या तोंडाशी बराच वेळ उभी राहते. वादळ सुरू होऊन एक तास होऊन गेला आहे. घाबरून गेले असले तरी पृथ्वीवरच्या रौद्र निसर्गाने मी अचंबित झाले आहे. स्वर्गावर पाऊस आणि वारा नेहमीच हळुवार असतो आणि रवीचं ऊन्हसुद्धा. पंचमहाभूतांचं असलं खवळलेलं रूप आम्हांला परिचित नाही. पण स्वर्ग हा अभियांत्रिकीने सुधारलेला ग्रह आहे हे आमच्या लक्षातच राहत नाही. पृथ्वी अनघड आहे. इथला निसर्ग पाळीव नाही. माणूसदेखील त्याला लगाम लावू शकला नव्हता आणि आता तर इथे त्याचंच राज्य आहे. आता निसर्ग स्वतःचा स्वामी आहे. सार्वभौम ‘गाईया’ ने पंचमहाभूतांवर पूर्ण ताबा मिळवला आहे. तिला शृंखला मान्य नाहीत आणि ती पुन्हा लगाम लावून घेणार नाही. आज पहिल्यांदाच मला आमच्या प्रकाशस्नानाच्या प्रार्थनेचा अर्थ समजतो :

“हे निसर्गाच्या सर्वोच्च शक्ती! तुझी ताकद आणि बल मला प्रदान कर. तुझ्या शक्तीचा माझ्यात संचार होऊ दे आणि तुझ्या प्रकाशाने माझं मन उजळून निघू दे!”  मूळ निसर्गाची शक्ती ही अशी आहे. 

वादळ संपेपर्यंत मला गुहेतच थांबावं लागणार आहे. मी माझा कॉम बाहेर काढते पण त्यात सिग्नल दिसत नाही. विमानापासून मी बराच वेळ बरीच लांब राहिले आहे. मी माझी संरक्षणाची पिशवी उचलते. तळ्याच्या काठापासून ते गुहेपर्यंतच्या अंदाधुंदपणे धावत केलेल्या प्रवासातही मी ती पिशवी सोडली नव्हती. पिशवी उघडून मी आत धुंडाळते आणि आग पेटवण्याचं साहित्य बाहेर काढते. ऊब मिळण्यासाठी आणि मन खंबीर ठेवण्यासाठी मला आग पेटवायला हवी. लवकरच पूर्णपणे काळोख होईल. तारे नसलेलं आकाश आणि भरून आलेलं आभाळ यांमुळे गच्च अंधारात मी नष्ट होऊन जाईन. 

मी आग पेटवते, शेकोटीचं रिंगण सुरक्षित करते आणि तिच्या बाजूला बसून राहते. कित्येक हजार वर्षांपूर्वी, या ग्रहावरच्या पहिल्यावहिल्या मानवांनी वादळापासून असाच आसरा शोधला असेल. आज, मी त्यांची लेक, अब्जावधी मैल दूर असलेल्या तिच्या अंतराळातील घरून परत आले आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला. मी पेंगत असताना मला कडेवर घेऊन आई या गोष्टी मला सांगायची. त्या गोष्टींची मला भीतीही वाटायची आणि आकर्षणही. ती गोष्ट सांगत असतानाच मी आणखी तिच्या कुशीत शिरून झोपून जायची. आतासुद्धा मला तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपावसं वाटतं आहे. दमले आहे मी…  

पण मी बसून राहते आणि थोड्या वेळाने मला आठवतं, की आईने दिलेला कागदावरचा फोटो अजूनही माझ्याजवळ आहे. मी तो पिशवीतून बाहेर काढते आणि आगीच्या ज्वाळांच्या हलणाऱ्या प्रकाशात आईचा चेहरा पाहते. 

“बघ आई, मी घाबरले नाही. मी वादळातून पळत निघाले आणि मला ही गुहा सापडली. सकाळ होईपर्यंत मी इथे बरी आहे. तू काळजी करू नको.”

मी मोठ्याने तिच्याशी बोलते. माझं बोलणं तिला ऐकू जात असेल का? अंतराळाच्या अब्जावधी मैल पसरलेल्या पोकळीतून? माझा आवाज नव्हे, पण माझ्या भावना? कदाचित त्या पोचत असतील… आणि पपा? किंवा जयंत?

“उद्या मी घरी परत जाईन, आई… नाही, आपल्या स्वर्गावरच्या घरी नाही. पृथ्वीवरच्या माझ्या नव्या घरी आणि मग, मी पुरातत्व अवशेष शोधायला जाईन. तू मला सांगायचीस त्या सगळ्या गोष्टींचे पुरावे शोधायला मी जाईन. गच्चीवरच्या दुर्बिणीतून तू पृथ्वी पाहायचा प्रयत्न करशील का? तू आपल्या पूर्वीच्या घरी परत गेलीस ते मला माहीत आहे आणि तिथे तू आपली जुनी दुर्बीण बसवून घेतलीस हेपण माहीत आहे. पण मला बघायचा नक्की प्रयत्न कर आई. तुला मी दिसणार नाही हे मला माहीत आहे, पृथ्वीसुद्धा दिसणार नाही तुला. पण तू माझ्या दिशेने पाहते आहेस हे मला कळलं तर मला बरं वाटेल.”

बाहेर वादळ चालू राहतं आणि मी आईच्या फोटोशी बोलत राहते. निदान तीच शेवटची गोष्ट मला सकाळी उठल्यावर आठवते. गुहेच्या दारातून मला स्वच्छ सूर्यप्रकाश दिसतो. पंधरा तासांपूर्वी हिमालयाच्या कुशीत मी जेव्हा विमान उतरवलं तेव्हा होता तितकाच तलावही शांत आहे. वादळ शांत झालं आहे आणि पावसाचा मागमूसही नाही. स्वर्गावर रवी प्रकाशतो तसाच सूर्यही तळपतो आहे. एखाद्या आदिमानवासारखी ओरडत आणि पंख फडकावत मी गुहेतून बाहेर पळत येते. गुहेच्या बाहेरचा चिखल सोडला तर सगळं काही तेजस्वी आणि निरामय आहे. मी पुन्हा पळत गुहेत जाते, आगीची पेटी बंद करते आणि माझी सुरक्षेची पिशवी उचलते. आता घरी जायची वेळ झाली आहे. 

सुरक्षेची पिशवी मी पाठीवर बांधते, माझे पंख पसरते आणि आकाशात भरारी मारते. टेकडीला वळसा घालताना माझी छाती धडधडू लागते. मला अचानक एक अवाजवी भीती वाटू लागते. मी काल सोडलं तिथे माझं विमान दिसलंच नाही तर? ते वादळात अदृश्य तर झालं नसेल? पण टेकडीच्या कड्याला वळसा घालताच मला विमान दिसतं, काल संध्याकाळी मी जिथे ते ठेवलं होतं त्याच जागी. मी माझा फुगा दुरुस्ती यंत्रात घालते, माझा कॉम ऊर्जेच्या पेटीला जोडते आणि विमानाचं नियंत्रण हातात घेते. 

______________________________________________________________________________________________________________

पुढचा पश्चिमेकडे प्रवास निर्विघ्नपणे पार पडतो. एका तासापेक्षा थोड्या अधिक वेळात मी माझ्या घरच्या तळावर पोचते. मी विमान खाली उतरवण्याची तयारी करू लागते आणि माझ्या असं लक्षात येतं, की माझ्या गटाचे पाचही सदस्य माझी वाट बघत विमान उतरवण्याच्या जागेपाशी गोळा झाले आहेत. मी विमानातून बाहेर येऊन उडत खाली जाताच सगळेजण मिठी मारून माझं स्वागत करतात आणि सगळे एकदमच बोलायला लागतात. 

“तू सुखरूप परत आलीस!”

“ठीक आहेस ना तू?”

“तुझ्या कॉमला काय झालं?”

“आम्हांला किती काळजी वाटत होती. रात्रभर तुझ्याशी काहीच संपर्क होऊ शकत नव्हता.”

खरंच की! ते लोक इतकी काळजी करत असतील हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. वादळाच्या कचाट्यातून सुटण्याच्या नादात माझ्या हे लक्षातच आलं नाही, की रात्रभर माझा माझ्या पथकाशी आणि इतर पथकांशी संपर्क नव्हता आणि सकाळीसुद्धा मी सुखरूप आहे हे त्यांना कळवण्याचा मी काहीच प्रयत्न केला नव्हता. मला थोडं ओशाळवाणं वाटतं आणि त्यांच्या आपुलकीने बरंदेखील वाटतं. आम्ही सगळे प्रयोगशाळेत जाऊन बसतो आणि मी त्यांना वादळाची हकीकत सांगते आणि मग पुरातत्व अवशेषांविषयी आणि माझा त्यासंबंधी काय तर्क आहे हेदेखील सांगते. 

“ते खरंच तिसाव्या शतकातले पेट्रोल पंपाचे अवशेष आहेत का नाही हे आपल्याला कधीच खातरीपूर्वक कळणार नाही. पण तुझ्यासाठी आता आणखी काम आहे, आरुषी,” ॲग्नॉन हसून म्हणतो. 

“ते  कोणतं?” 

“ऑस्ट्रेलियातल्या पथकाला अधिक चांगले अवशेष सापडले आहेत आणि तुला आता त्यांचा अर्थ लावता येईल,” एन कियांबी म्हणतो. 

“हो. त्यांनी दिलेल्या माहितीवरून असं वाटतं आहे, की ती युद्धाच्या काळातली घरं असावीत.”

“काय सांगतोस! असं काहीतरी सापडावं अशी माझी फार इच्छा होती, ” मी उत्साहानं म्हणते. 

“हे घे, हे फोटो बघ,” त्याचा कॉम माझ्या हातात देत ॲग्नॉन म्हणतो.

________________________________________________________________________________________________________________

प्रकरण सतरावे समाप्त

Author

Leave a Reply