प्रतिसाद : अनिश्चितता, जानेवारी २०२६ अंकाचे संपादकीय.     

 प्रतिसाद : अनिश्चितता, जानेवारी २०२६ अंकाचे संपादकीय.      

भारतीय समाजजीवनातील सामाजिक, राजकीय, व्यायसायिक आणि आर्थिक  अस्वस्थता हे शिक्षित तरुणांच्या अमेरिकेसारख्या देशात होणाऱ्या स्थलांतराचे मुख्य कारण आहे आणि या स्थलांतराच्या मागे खालील घटक कारणीभूत आहेत असे  संपादक डॉ.अनिल जोशी यांना  वाटते. त्यांच्या मताचा हा प्रतिवाद – 

१ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील गोंधळ आणि अनिश्चितता  :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न होणे, त्यांतील गोंधळ, पैशाचा भरमसाठ वापर या बाबी खऱ्या असल्या तरी स्थलांतर करणाऱ्या तरुणांना यात खरोखरच  आस्था आहे का? हा तरुणवर्ग निवडणुका लढवणे तर सोडाच, परंतु मतदान करायला तरी उत्सुक असतो का हे तपासायला हवे. शहरी भागांतून होणारे कमी मतदान त्यांची अस्वस्थता नाही तर उदासीनता दाखवते. बरे, ज्या देशात हा तरुण वर्ग स्थलांतर करतो तिथे त्यांना अगदी ग्रीन कार्ड मिळाले तरी निवडणूक लढवायचे तर सोडाच अगदी मतदानाचा तरी अधिकार आहे का? याचा विचार एकदा व्हायला हवा. निवडणूक प्रक्रियेत ढवळाढवळ, पैशाचा वापर फक्त भारतातच होतो असे नाही, तर प्रगत देशांतही झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत.  उलटपक्षी भारतात गेल्या ७५ वर्षांत राबवलेली निवडणूक प्रक्रिया भारतात लोकशाही अजूनतरी जिवंत आहे हेच दर्शवते. 

२ वशिलेबाजीमुळे गुणवत्तेला कमी महत्त्व मिळते आणि पात्र उमेदवार मागे पडतात  :

भारतातील सरकारी आणि खासगी मोठ्या आस्थापनांमध्ये राबवण्यात येणारी नोकर-भरतीची प्रक्रिया सरसकट वशिलेबाजीवर आधारित आहे असे मानणे या प्रक्रियेवर आणि त्यातून निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांवर अन्याय करणारे  आहे आणि हा प्रकार फक्त भारतातच होतो आहे असे मानणे अधिक अन्यायकारक आहे. 

३ रोजगार निर्मितीचा वेग

भारतीय समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था उच्च गुणवत्तेच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात निर्माण करत नाहीत हे खरे असले, तरी हा प्रश्न फक्त भारतापुरताच मर्यादित नाही. अगदी अमेरिकासुद्धा या प्रश्नामुळे आपले रोजगारासंबंधी धोरण बदलताना दिसत आहे. याबरोबरच  स्थलांतरित सर्वांनाच परदेशात उच्च गुणवत्तेच्या नोकऱ्या मिळतात असे नाही; तर या वर्गातील मोठा घटक तिथे  अर्धकुशल नोकऱ्या पत्करताना दिसतो. उच्च गुणवत्तेची नोकरी नव्हे, तर जिथे संधी मिळेल तिथे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न हाच सध्यातरी निकष दिसतो. 

दुसरे म्हणजे आजकाल प्रत्येकाला आयटी क्षेत्रातच नोकरी हवी आहे त्यामुळे भारतातच उपलब्ध असलेल्या इतर क्षेत्रांतील संधींकडे दुर्लक्ष होत आहे, जिथे तुलनेने जास्त कष्ट आहेत आणि जो blue collared job समजला जातो तिथे नोकरी करण्याची मोठ्या  वर्गाची तयारी नाही. 

४ व्यवसायातील अस्थिरता

सरकारी नियमांतील क्लिष्टता, स्टार्टअपला येणाऱ्या अडचणी यांमुळे भारतात नवीन उद्योग सुरू करणे जिकिरीचे असले तरी बहुतेक स्थलांतरित वर्ग परदेशात जाऊन  स्वतःचा व्यवसाय करताना नाही, तर नोकरी करण्यातच धन्यता मानताना दिसतो.

५ वेतन आणि संधींतील विसंगती आणि ROI :

अमेरिकेत मिळणारे वेतन भारतात मिळणाऱ्या वेतनापेक्षा जास्त आहे यात शंका नाही; परंतु चलन विनिमयाच्या तफावतीमुळे आपल्याला ते आणखीच जास्त वाटते.  वेतन जसे जास्त असते तसेच  तिथली कॉस्ट ऑफ लिव्हिंगदेखील जास्त असते. याचा थेट परिणाम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगवरतीदेखील होतो. सामान्य स्थलांतरित वर्गाला  घरकामासाठी नोकर ठेवणे यासारखी भारतात सोपी वाटणारी गोष्टदेखील अवघड असते. 

अमेरिकेत शिक्षणासाठी होणारा खर्च हा तिथे चांगली नोकरी मिळाली तर ठीक, पण दुर्दैवाने  भारतात परत यावे लागले तर ROI खूप धोकादायक ठरू शकतो. 

६ विकसित देशांमध्ये सामाजिक सुरक्षा, आरोग्य-विमा, निवृत्ती योजना, बेरोजगारी भत्ता  यांसारख्या गोष्टी सरसकट सर्वांनाच मोफत नसतात आणि बऱ्याच वेळा त्यासाठी पैसा खर्चावा लागतो. अमेरिकेत सामाजिक सुरक्षेचे फायदे मिळायला कमीत कमी १० वर्षे नोकरी करावी लागते, निवृत्तियोजना पगारातील contributionवर अवलंबून असते; तर बेरोजगार भत्ता फक्त अमेरिकन नागरिकांनाच मिळतो.

माझ्या मते स्थलांतराची प्रमुख कारणे थोडक्यात,

१ भारताने अलीकडच्या काळात खूप प्रगती केली आहे आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्या आहेत हे खरे असले; तरी आजही अमेरिकेमध्ये असलेल्या सुविधा, सुखसोयी, जीवनशैली या भारतापेक्षा निश्चितच उच्च दर्जाच्या आहेत आणि भारताच्या कित्येक मैल पुढे आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि याची भुरळ पडणे स्वाभाविक आहे, म्हणजेच या स्थलांतरामागे भौतिक सुखसोयींचा विचार होतो. 

२ १९६०च्या दशकापासून भारतातून अमेरिकेत स्थलांतरित होणारा वर्ग प्रामुख्याने IIT / IIM मधील उच्चशिक्षित, अतिशय हुशार, प्रतिभाशाली असल्याने अमेरिकेत या वर्गाला चांगल्या संधी आणि जीवनशैली मिळाली. १९९० नंतर आलेल्या IT क्रांतीमुळेदेखील  अमेरिकेत रोजगाराच्या संधी  मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या. या वर्गालाही मिळणारे चांगले  वेतन, त्यांची राहणीमानाची उत्तम शैली ही निश्चितच भारताच्या तुलनेत उच्च दर्जाची होती. हा वर्ग जेव्हा भारतात येई तेव्हा त्यांच्या जीवनशैलीचे, सुखसोयींचे  वर्णन ऐकून त्यांच्या संपर्कात येणारे नातलग / मित्रपरिवार यांच्या पुढच्या पिढीत आपणही अमेरिकेत जाऊन अशा  दर्जाचे आयुष्य जगावे अशी महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आणि यात काही गैरही  नाही.

३ सुरुवातीला भारतातून उच्च शिक्षित आणि प्रथितयश संस्थांतील विद्यार्थीच अमेरिकेतील नावाजलेल्या विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्ती मिळवून शिक्षण घेत आणि तिथेच स्थायिक होत. कालांतराने अनेक अप्रसिद्ध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन तिथे स्थायिक होण्याचा एक नवीन trend सुरू झाला. सुरुवातीला असलेली पायवाट हमरस्ता झाल्याने अमेरिकेत जाणाऱ्या  विद्यार्थिवर्गामध्ये संख्यात्मक वाढ झाली, गुणात्मक नाही. 

४ Brain Drainच्या दृष्टीने विचार करता अमेरिकेत जाण्यासाठी येणारा खर्च (फी आणि राहण्याचा खर्च) शिष्यवृत्ती किंवा अर्धवेळ नोकरी मिळाली नाही तर पालकानांच करावा लागतो, जो सामान्य कुटुंबाला शक्य नसतो. त्यामुळे या स्थलांतरित वर्गात प्रामुख्याने शहरी उच्च मध्यमवर्गीय किंवा ग्रामीण भागातील सधन वर्गातील मुलांचा भरणा जास्त असतो. भारतात केवळ याच वर्गांमध्ये बुद्धिमत्ता असते असे समजणे थोडे धाडसाचे ठरेल.

५ आकाराने प्रचंड मोठा देश, तुलनेने कमी लोकसंख्या, पुरेशा मनुष्यबळाचा अभाव यामुळे भूतकाळात अमेरिकाही अशा कुशल मनुष्यबळाच्या स्थलांतराला प्रोत्साहन देत असे. अगदी अभिमानाने आमचा देश  ‘Melting Pot’ आहे आणि सर्वांना आमच्या  देशात प्रगतीची समान संधी आहे असे सांगत असे. खरे पाहता कमी वेतनात  काम करणारी माणसे मिळतात म्हणूनच अमेरिका अशा लोकांचे स्वागत करत होती. 

सारांशाने या स्थलांतरामागे आर्थिक सुबत्ता आणि भौतिक सुखसोयींचा विचार तात्त्विक विचारांपेक्षा किंवा तिथे बुद्धिमान लोकांना अधिक आव्हानात्मक संधी मिळतात यापेक्षा  जास्त होता आणि आहे.

आता परिस्थिती बदलली आहे, अमेरिकेत रोजगाराच्या संधी  विविध कारणांमुळे कमी होत आहेत. त्यामुळे ‘उपलब्ध रोजगार मूळ अमेरिकन लोकांनाच मिळाले पाहिजेत,’ हे ट्रंप  यांचे धोरण त्याचाच परिणाम आहे. बदललेल्या परिस्थितीत रोज ट्रंप प्रशासनाचे तुघलकी  निर्णय/ निर्बंध येत असताना उद्या आपल्यावर कोणती आपत्ती ओढवणार आहे? आपल्याला अमेरिकेत राहू दिले जाईल की नाही? याची टांगती तलवार आपल्या आणि आपल्या पालकांच्या डोक्यावर ठेवून जगणे खरोखरीच सुखाचे आहे का आणि अमेरिकेत शिक्षणासाठी होणारा खर्च करणे सद्यःस्थितीत योग्य आहे का? (सर्वच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळतेच असे नाही.) याचा विचार ज्याचा त्याने केला पाहिजे.

या ठिकाणी थोडे विषयांतर करून आपल्या विचारातील एका विसंगतीकडे लक्ष वेधणे जरूरी आहे. आपल्याला अमेरिकेत येऊ देत नाही म्हणून ट्रंप यांच्या धोरणाला विरोध करायचा आणि इतर राज्यांतून पुण्या-मुंबईत येणाऱ्या  भारतीयांना आमच्या रोजगारावर परिणाम होतो म्हणून विरोध करायचा, अमेरिकेत दिवाळी, आपले सण समारंभ साजरे होतात म्हणून आनंद व्यक्त करायचा; पण उत्तर भारतीयांनी मुंबईत छटपूजा केलेली आम्हांला खटकते, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष झाल्या म्हणून आमचा ऊर भरून येतो, पण मुंबईचा महापौर मराठी असावा की अमराठी, भारतीय हिंदू असावा की भारतीय मुस्लीम हे आमच्या अस्मितेचे मुख्य मुद्दे. ही विसंगती जोपर्यंत आपल्या मनामध्ये आहे तोपर्यंत ट्रंप बरोबर की चूक याचे खरे उत्तर आपल्याला मिळणार नाही.

 दीपक सरदेशमुख, पुणे 

**************************************************************************************************************

I read the recent issue on line.I liked the articles on Akashwani and Konkan railway. I noticed that in Akashwani there is a notable omission of ” Geetramayan”. It was epic in many ways. Also there is no mention of Mr.Sridharan,chief who managed Konkan railway.

Anand Barve

Leave a Reply