आकाशवाणीचं हे ….
‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।
वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’
(उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.)
भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली. भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण म्हणावे लागेल. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, समाजमाध्यमांच्या जोरदार आक्रमणामुळे आकाशवाणीचे काय होईल असे गेल्या काही वर्षांपर्यंत वाटत होते; परंतु आकाशवाणीनेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले. स्वतःचे ॲप तयार केले. विविध समाजमाध्यमांचा वापर करून त्यांवरून आपले दर्जेदार कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आजही आकाशवाणी भारतीय जनमानसातले आपले स्थान व विश्वासार्हता टिकवून आहे. शतकपूर्तीच्या या वळणा-वाटांचे सौंदर्य आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त उपसंचालक गोपाळ अवटी हे आपल्याला क्रमशः उलगडून दाखवत आहेत.
भाग ४
विस्तार आणि आशयसंपन्नता
बॉम्बे रेडिओ क्लब, कलकत्ता रेडिओ क्लब मद्रास प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब आणि इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या सर्वांच्या प्रयत्नांतून १९२३ पासून रेडिओ प्रसारणालाझालेली सुरुवात १९२७ पर्यंत हळूहळू सुसंघटित (ऑर्गनाइज्ड) होत गेली. १९४८ पर्यंतम्हणजे स्वातंत्र्यप्राप्ती समयी भारतात दहा आकाशवाणी केंद्रे कार्यरत झाली. फाळणी झाली
त्या वेळी भारतात सहा आणि पाकिस्तानात तीन अशी केंद्रसंख्या होती. १९५० आणि १९६० या दोन दशकांनी आकाशवाणीच्या जाळ्याचा विस्तार आणि आशय संपन्न उपक्रम या दोन्ही स्तरांवर बरीच प्रगती घडवली.
सेंट्रल न्यूज ऑर्गनायझेशन हा विभाग दोन भागांत कार्यरत झाला. न्यूज सर्व्हिस डिव्हिजन आणि एक्स्टर्नल सर्व्हिस डिव्हिजन.
पहिल्या विभागाने भारताच्या अंतर्गत वृत्तसंकलन, प्रसारणाची प्रामुख्याने जबाबदारी पाहिली; तर विदेश सेवा विभागाने केलेल्या कामाला तोडच नाही. या विभागाने युरोप, आफ्रिका, आशिया खंडांतील ३०हून अधिक देशांपर्यंत ऐकल्या जातील अशा भारतीय आणि विदेशी भाषांतून बातम्या, वार्तापत्रे आणि अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम नियमित सुरू केले. हिंदी, इंग्रजी, अरेबिक, बलुची, बर्मी, दारी, फ्रेंच, पर्शियन, गुजराथी, पंजाबी, पुश्तू, रशियन, सिंधी, सिंहली, स्वाहिली, तमिळ, थाई, तिबेटीयन, उर्दू, मॅन्ड्रेन, बंगाली, तेलगू अशा विविध भाषांतून जगभर आपली प्रसारण सेवा या विभागाने पोचविली आणि आजही पोहोचवत आहे. ही सगळी अद्भुत सुरुवात होती.
शास्त्रीय संगीताचे राष्ट्रीय कार्यक्रम १९५० च्या दशकात सुरू झाले. नभोनाट्ये प्रसारित होऊ लागली. रेडिओ संगीत संमेलने भरवली जाऊ लागली. सर्वात महत्त्वाचं वळण म्हणजे ऑक्टोबर १९५७ मध्ये विविध भारती सेवा सुरू झाली. मनोरंजन आणि पुढे १९६७ मध्ये त्यावर सुरू झालेले जाहिरात प्रसारण आकाशवाणीच्या इतिहासातील महत्त्वाचे वळण ठरले. १९६९ च्या जुलै महिन्यात युववाणी कार्यक्रम सुरू झाला. तरुणांचे विचार, मतं, लेखन, कला यांना अभिव्यक्तीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ मिळाले.
या काळापर्यंत म्हणजे जवळपास १९७६ पर्यंत एकाच विभागात असणारे आकाशवाणी – दूरदर्शन एप्रिल १९७६ मध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीने स्वतंत्र झाले. अर्थात ही विभागणी मानव संसाधनाच्या (मॅनपॉवर) दृष्टीने काळाच्या कसोटीवर व्यवहार्य राहिली
नाही; कारण कार्यक्रम, अभियांत्रिकी आणि लेखा वित्त विभागांतील सर्वच कर्मचाऱ्यांच्या बदल्या परस्पर विभागांत होतच राहिल्या. कारण ज्येष्ठता याद्या (सिनिऑरिटी लिस्ट) एकच होत्या. त्यामुळे बदल्या कुठेही होत होत्या. पुढे पुढे तर या ज्येष्ठता याद्यांनाही अर्थ राहिला नाही; कारण बढत्या २०-२० वर्षं केल्या गेल्या नाहीत. पर्यायाने शेकडो प्रकरणांत न्यायालयीन लढे, स्थगित्या – जैसे थे (स्टे) प्रकार चालू झाले. करिअरमधले साचलेपण एवढे वाढले, की एकूण वातावरणात डबक्याचा आभास – विशेषतः कार्यक्रम निर्मिती करणऱ्यांच्या मनात साचू लागला. निर्मितिशीलता, नित्यनूतन उत्साह, सामाजिक बदलांबाबतची संवेदनशीलता, आशयातील विश्वासार्हता, प्रश्नांबद्दलचा विरोधी आवाज, लोकशाहीतली दुसरी बाजू या सर्व स्तरांवर मोठीच आव्हाने होती. आपल्या क्षमतेविषयी साशंक व्हावे एवढी न्यूनगंडाची समस्या तीव्र होत गेली; पण सर्वत्र सद्विचारी, सदाचारी, समतोल, निःस्वार्थी दृष्टिकोण ठेवणारी माणसं असतातच. अशा विचारांच्या कार्यक्रम कर्मचाऱ्यांनी आशयातल्या नावीन्याची काळजी घेतली. इलेक्ट्रॉनिक स्पर्धेत आकाशवाणीची ध्वजा फडकत ठेवली.आपल्या माध्यमाचेही स्वतःचे म्हणून सामर्थ्य आहे हे ‘स्पिरिट’ कायम ठेवत आव्हान पेलण्याची क्षमता संपुष्टात येऊ दिली नाही. या माध्यमाचे ‘यूएसपी’ (युनिक सेलिंग पॉईंट्स) पुन्हा एकदा लखलखीत पुसून, चकाकून घेतले. १९८०-९० चा हा सुमार होता. लोकप्रसारणाला आता विकेंद्रीकरणाची जोड मिळाली. १०० आकाशवाणी केंद्रांची संख्या १९५ वर गेली. मेट्रो स्टेशन्स, एफ. एम. स्टेशन्स नव्याने कार्यरत झाले. भारताचा ९०% भूभाग आकाशवाणीने अंकित केला होता. ९७% लोकसंख्याही आपल्या प्रभाव क्षेत्रात सामील करून घेतली होती. नव्या व्यवस्थापन तज्ज्ञांना आमदनीचे स्वप्न पडू लागले होते.रेडिओच्या (आकाशवाणीच्या अर्थाने) सर्वच वाहिन्या जाहिरातींना व्यापायला खुल्या झाल्याहोत्या आणि परिणाम म्हणून १३७% उत्पन्न वाढले होते. इथे आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे, की फेब्रुवारी २०१६ मध्ये FM लहरींचे जे फेज २ चे जे beeding झाले त्यातून ११५० कोटी रुपयांचे उत्पन्न उद्दिष्ट ठेवले गेले; ते पूर्ण झाले. एकूण २८० लहरींचे खासगी संस्थांना वितरण करण्यात आले. द सन ग्रुपने ७१ तर रिलायन्सच्या ॲडलॅब ग्रुपने ५६ लहरी विकत घेतल्या.या सर्वांचा परिणाम म्हणून तरुण वर्गास आकर्षित करणाऱ्या खासगी रेडियो केंद्रांचे जाळे विणले गेले.
गडावरच्या तोफेची वाट न पाहता अनेक बाजीप्रभू पावनखिंड लढवत होते. आता सादरकर्त्यांसोबत श्रोत्यांचेही आवाज अधिक दमदारपणे ऐकू येत होते. त्यामुळे संदेशवहनातली एकतर्फी वाहतूक संपून टाकत मार्ग दुतर्फी मोकळा झाला होता. त्या मार्गावर एफ. एम. तंत्रज्ञानाने आपल्या कमानी लावल्या. संदेशवहनातील खरखर कमी होऊन प्रसारणात स्पष्टता येत गेली. लोकप्रियतेला आपसूक बळ मिळाले. हे विकेंद्रीकरणाचे वारे आणि ब्रॉडकास्टपासून नॅरोकास्टचे बदल श्रोत्यांनाही आवडले होते. एफ. एम. तंत्रज्ञानामुळे साधारण ६० ते १०० किलोमीटर परिघात उत्तम ऐकू येणाऱ्या जिल्हास्तरीय केंद्रांनी स्थानिक कलावंत, शेतकरी, सार्वजनिक सेवेतील प्रमुख,गृहिणी, कृषितज्ज्ञ, लोककलाकार या सर्वांना ‘आपल्या हाताशी हक्काचे माध्यम आले,’ हेसमाधान मिळाले. खरखरणाऱ्या मध्यम आणि लघु-लहरींची सद्दी संपली आणि यामाध्यमाने पुन्हा एकदा कात टाकली. आसमंत जणू फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन रेडियो लहरीने (एफ. एम.) व्यापून टाकले होते.
* * * * *




आकाशवाणी का हा बोलका आलेख छान आकारला आहे.
अभिनंदन श्री.गोपालजी.