‘माझा (पण) बेहद्द नाममात्र घोडा’ विडंबन कविता-संग्रहाचे प्रकाशन
संस्कृती प्रकाशनाच्या वतीने बुधवार २८ ऑगस्टच्या संध्याकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन
सभागृहात अंतर्नादचे लेखक, कवी हेमंत जोगळेकर यांच्या ‘माझा (पण) बेहद्द नाममात्र घोडा’ या विडंबन संग्रहाचे प्रकाशन साक्षेपी समीक्षिका डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ कवयित्री, लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांनी समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले.
“प्रत्येक कवीचा चैतन्यधर्म किंबहुना त्या काळाचा इथॉस जोगळेकरांनी आपल्या विडंबन काव्यात नेमकेपणाने पकडला आहे आणि त्यासाठी त्यांनी मातब्बर कवी तर घेतेलेले आहेतच; पण तुलनेने नव्या कवींकडेही लक्ष वेधले आहे,” असे उद्गार डॉ. वंदना बोकील यांनी या प्रसंगी काढले. “अर्वाचीन मराठी काव्य परंपरेतील
जवळजवळ पन्नास वर्षांच्या कालखंडातील सर्व काव्यप्रकार आणि साहित्यातील प्रवाह जोगळेकरांनी बारकाईने, कुशलपणे आपल्या विडंबन काव्यात दाखवले आहेत आणि ते करत असतानाची जोगळेकरांची शब्दांवरील आणि लयीवरील हुकमत वाखाणण्याजोगी आहे;” असे मत डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
“मूळ कवितेतील एखादा विशेष जो मूळ कवितेतील दोष नसेलही; पण तो जर कमालीचा ताणला तर कसा
हास्यास्पद होऊ शकतो हे माझे विडंबन दाखवते. मूळ कवितेला सर्जक पर्याय देते,” अशा शब्दांत कवी जोगळेकरांनी
आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्कृती प्रकाशनाच्या सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले.
दीपाली दातार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कवितासंग्रहाला डॉक्टर महेश केळुसकर यांची प्रस्तावना आहे. अंतर्नाद वाचकांसाठी ती सोबत देत आहोत.
जोगळेकरांचा लंबी रेस का घोडा
डॉ. महेश केळुसकर
तब्बल ३९ वर्षांनी, हेमंत गोविंद जोगळेकर यांचा १५ मे १९८४ रोजी प्रकाशित झालेला ‘माझा (पण) बेहद्द नाममात्र घोडा’ नवा दम आणि जोम घेऊन मराठी कवितेच्या रेसकोर्सवर धावायला पुन्हा सज्ज झाला आहे. एखादा कवितासंग्रह इतकी वर्षं वाचकांच्या लक्षात राहणं, त्याची लोकप्रियता टिकून राहणं ही आजच्या काळात तरी दुर्मीळ गोष्ट झालेली आहे; पण जोगळेकरांचा हा घोडा मुळातच बेहद्द असल्याने, एवढ्या वर्षांत वाङ्मयीन विडंबनाच्या क्षेत्रात आपल्याला कोणी आव्हान देतंय का याची वाट बघून, शेवटी स्वतःच स्वतःला आव्हान देऊन या रेसकोर्सवर त्यानं पुन्हा उडी मारली असावी.
मूळ संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत बाळ गाडगीळ यांनी मराठी विडंबन कवितेचा संक्षिप्त आढावा घेऊन आचार्य अत्रे यांच्या ‘झेंडूची फुले’ नंतर विडंबन क्षेत्रात आपल्या टापा टाकणारा जोगळेकरांचा ‘बेहद्द घोडा’च असल्याचे म्हटले आहे; पण हे १९८४ चे विधान आहे. त्यानंतर अनेकांचे विडंबन कवितासंग्रह आलेले आहेत आणि सध्यातर समाज माध्यमांवर विडंबन कवितांचा सुकाळ सुरू आहे. अशा परिस्थितीत ‘बेहद्द’ पुन्हा का आलाय? तर वाङ्मयीन विडंबनांच्या क्षेत्रात तरी जोगळेकरांनी आपली पृथगात्मता अजूनही टिकवून ठेवलेली आहे म्हणून. ‘वाङ्मयीन विडंबन’ हा प्रकार कधीच साधा सोपा नसतो. त्यासाठी वाङ्मयीन परंपरांचं भान आणि आकलन असावं लागतं. काळाच्या पटलावरील विसंगतीचं सजग निरीक्षण असावं लागतं. त्या त्या कवीची किंवा लेखकाची शैली माहीत असावी लागते. नवीन प्रवाहांचीही नोंद करावी लागते. वाङ्मयीन विडंबने सहसा कालबाह्य होत नाहीत आणि त्यामुळेच जोगळेकरांचा बेहद्द घोडा आजच्या काळातही वाचनीय ठरतो. विडंबन म्हणजे केवळ खिल्ली उडवणे नव्हे, असे सांगून बाळ गाडगीळ यांनी, ‘त्यात विसंगतीचे दर्शन हवे आणि गंमतही हवी,’ अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. या अपेक्षा जोगळेकरांची विडंबने पूर्ण करतात. गाडगीळ यांची आणखी एक रास्त अपेक्षा होती, जी ‘बेहद्द’च्या पहिल्या आवृत्तीत पूर्ण करता आली नव्हती – मूळ कविता माहीत नसल्यामुळे त्यातील विडंबनाची खुमारी समजून येत नाही अशी गाडगीळांची तक्रार होती. आता ह्या बेहद्दच्या सुधारित आवृत्तीत त्या सर्व मूळ कवितांचा अंतर्भाव करून तक्रार निवारण करण्यात आले आहे. नव्या ‘बेहद्द’मध्ये जोगळेकरांचा जुना ‘उपोद्घातही आहे. त्यात त्यांनी ‘कवीची अंतःप्रेरणा’ ह्या काही कवींनीच प्रसूत केलेल्या ‘मिथ’ ची केलेली गमतीदार चेष्टा आजही तितकीच रोचक वाटते. ‘नव्या कवींवर जुन्या कवींचे संस्कार असल्याशिवाय नवी कविता विकसित होऊ शकत नाही,’ हा असाच एक खाष्ट समीक्षकांनी पसरविलेला गैरसमज. त्याला त्याच भाषेत उत्तर देताना आणि या विडंबनांचा उद्देश सांगताना जोगळेकर म्हणतात, “एव्हाना संस्कारित झालेल्या माझ्या अंतःप्रेरणेने प्रस्तुत ‘बंच’ म्हणजे आधुनिक मराठी कवींच्या संस्कारांचा आढावा घेण्याचे ऐतिहासिक कार्य असल्याचे मला सांगितले म्हणून ते नम्रपणे, सटीक ग्रंथरूपाने मी चिकित्सक वाचकांपुढे ठेवीत आहे.”
याच गमतीदार शैलीत, दोन विडंबन कवितांच्या मधली सटीक भाष्ये आपल्याला संपूर्ण संग्रहात भेटत राहतात. त्यामुळे कवी आपल्या रसिकांशी प्रत्यक्ष संवाद साधतो आहे, असा फील येतो. ह्या निमित्ताने आधुनिक मराठी काव्यसमीक्षेची पुस्तकी परवड,जोगळेकर ठळक करत जातात आणि अत्यंत सौम्यपणे; पण खंबीरपणे आपली काव्यमर्मज्ञता दाखवून देतात. ज्यांना वाङ्मयीन संदर्भ माहीत आहेत, अशा प्रगल्भ काव्यरसिकांसाठी तर ही भाष्यावली म्हणजे वाङ्मयीन पर्वणीच आहे. विडंबनासाठी अनेक मातब्बर कवींबरोबरच अल्पपरिचित अशा काही कवींच्या कविताही जोगळेकरांनी निवडल्या आहेत.
बा. सी. मर्ढेकर हे आधुनिक मराठी काव्याचे जनक मानले जातात. महायुद्धोत्तर काळात अखिल दुनियेतच मानवीपणाला आलेले बकालपण आणि संवेदनबधिरतेचे दर्शन घडविण्यासाठी त्यांनी मराठी कवितेत विरूप प्रतिमा आणल्या; पण त्यांच्या निर्मितिविषयक कविताही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यांतील ‘असे काहीतरी व्हावे’ या बहुचर्चित कवितेचे विडंबन करून जोगळेकरांनी कवितेच्या विक्रयकेंद्री बाजारूपणाचा केलेला उपहास धारदार आहे. मर्ढेकरोत्तर काळातील पाडगांवकर-बापट-करंदीकर या कवींनी महाराष्ट्रात पहिल्यांदा जाहीर काव्यवाचनाचे कार्यक्रम सुरू करून सर्वसामान्य काव्यप्रेमींना मराठी कवितेच्या कक्षेत आणले. ॲकॅडेमिक वर्तुळातून मुक्त करून मराठी कविता खऱ्या अर्थाने लोकाभिमुख केली. त्यांच्या लोकप्रियतेचा मत्सर वाटून, ह्या त्रयीने ‘कवितेचे बघ्ये निर्माण केले,’ अशी काही समकालीनांनी त्यांच्यावर टीकाही केली; पण कवितेची समृद्ध मौखिक परंपरा पुढे चालू ठेवण्याचे आपले काम ह्या त्रयीने थांबविले नाही. साहजिकच त्यांच्या कवितेची दखल समीक्षकांनाही वेळोवेळी घेत राहावी लागली. आपल्यावर त्यांचे ‘एकत्रित संस्कार’ झाले, असे अर्थपूर्ण भाष्य करून या तिघांच्या एकूण सात कवितांची विडंबने जोगळेकरांनी ‘बेहद्द’मध्ये समाविष्ट केली आहेत.
‘उत्सव’ या पाडगांवकरांच्या कवितेतील पहिल्या स्पर्शाचा थरार आणि रोमॅंटिसिझम वास्तवाच्या पातळीवर आणताना पाडगांवकरांची ‘मऊ धिटाई’ जोगळेकरांनी ‘धट्ट धिटाई’त रूपांतरित केली आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणता – अजाणता ‘तिला’ लागलेला धक्का हा आपल्या मनातील पापभावनेचा आपल्यालाच बसलेला पहिला धक्का होता, असे ‘सत्यकथन’ करताना हा विडंबनकार हसवता हसवता वाचकाला अंतर्मुख करतो. संत एकनाथांनी भारुडांमध्ये सांसारिक प्रचलित विषय घेऊन विनोदनिर्मिती करत असताना, मानवी समूहाला षड्रिपूंची जाणीव करून दिली. ‘पहिला धक्का’ आणि अशा आणखी काही कवितांमधून जोगळेकरांनीही असेच कार्य केले आहे.
पु.शि. रेगे हे मराठी कवितेत ‘अल्पाक्षर रमणीय’ शैलीसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या ‘दुसरा पक्षी’ या कवितेचे विडंबन ‘दुसरा धक्का’ या शीर्षकाने संग्रहात येतं.
धक्का जो अंगाला धक्का देतो
आहे अंगच दुसरे पुन्हा त्या धक्क्यात
धक्का जे अंगाला देतो –
या शैलीदार फर्मास विडंबनामुळे रेगेंच्या अद्वैतवादी सिद्धांताला कवीने गमतीदार धक्का दिला आहे.
त्यानंतर विंदा करंदीकरांची आणीबाणीत गाजलेली ‘एक विरूपिका’ विडंबनकाराला आठवते आणि तो ‘तिसरा धक्का’ देतो. लोकशाहीचा पदर ओढणारे आणि पातळ सोडणारे सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत, हे करंदीकरांना त्या विरूपिकेत सांगायचे आहे; पण ते आडपडद्याने. जोगळेकरांनी हा आडपडदा दूर करून मराठी समीक्षकही एकाच माळेचे मणी आहेत हे सांगण्यासाठी त्यांच्या कृत्रिम परिभाषेची यथेच्छ ऐशीतैशी करून टाकून तिचे प्रच्छन्न दर्शन या विडंबन कवितेतून घडवले आहे.
प्रेमकविता आणि समाजदर्शन कवितांच्या प्रांतांत वसंत बापट मातब्बर कवी म्हणून ओळखले जातात. ‘एका कुमाराची कहाणी’ या कवितेतून शारीर जाणिवांमधील अध्यात्माचा शोध घेण्याचा प्रयत्न बापटांनी केला आहे; तर या कवितेचे विडंबन करताना जोगळेकर मध्यमवर्गीय कारकुनी जिण्याबद्दलचे वास्तव अधोरेखित करतात. या आयुष्यात छोट्या छोट्या स्वप्नांची पूर्ती होतानाही किती दमछाक होते हे दाखवून देताना कवी म्हणून त्यांनी दाखविलेली सहृदयता आणि अनुकंपा या विडंबनाला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातात.
‘काव्यदर्शन’ या कार्यक्रमाद्वारे पाडगांवकर- बापट- करंदीकर यांनी वाचकांच्या अभिरुचीचा विस्तार करत नेला ही गोष्ट खरी असली तरी लोकाग्रहाखातर त्यांना आपल्या त्याच त्याच कविता पुन्हा पुन्हा म्हणायला लागायच्या. विडंबनकाराच्या नजरेतून हे सुटलेले नाही. आपल्या ‘भाष्यावली’त यावर नेमके बोट ठेवून विंदांच्या ‘ते’ या कवितेचे केलेले विडंबन आणि खट्याळ शैलीत ‘आसक्ती’चा लावलेला अर्थ जोगळेकरांची मर्मज्ञता दाखवून देतात. आणीबाणीच्या काळात दुसरी एक प्रचंड गाजलेली कविता म्हणजे पाडगांवकरांची ‘सलाम.’ या कवितेत ‘भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम’ करत त्यांनी भयग्रस्त नागरिकांची कैफियत मांडली आहे. कराड इथं दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली १९७५ साली झालेल्या ५१व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी आणीबाणी चालू होती आणि साहित्य संमेलनावरही भीतीचं सावट होतं. भारताचे तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यांच्यासमोर आणीबाणीला विरोध करणारे भाषण दुर्गाबाईंनी केले. साहित्यिक म्हणून आपलं स्वत्व आणि सत्त्व दाखवून दिलं. ही सगळी वाङ्मयीन व राजकीय पार्श्वभूमी जोगळेकरांना तपशीलवार माहीत असल्यामुळे, १९७७ साली पुणे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात वेगवेगळ्या साहित्यिकांनी कशा परस्परविरोधी आणि आपापल्या सोयीच्या भूमिका घेतल्या हे त्यांनी दाखवून दिलं.
‘सलाम, नोव्हेंबर ७७, मुक्काम फुलेनगर’ या विडंबनात जोगळेकरांनी विडंबनकाराची सगळी कौशल्ये पणाला लावली आहेत. यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाची आणि स्वागत समिती सदस्यांची त्यांनी घेतलेली औपरोधिक हजेरी, हार-तुरे आणि दिखाऊपणावर केलेला बोचरा शब्दहल्ला, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नसणारी नियोजनशून्यता आणि विसंगतीचा घेतलेला समाचार पाडगांवकरांच्या मूळ ‘सलाम’ला न्याय देणारा ठरला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांवर डाव्यांचा आणि उजव्यांचा प्रभाव आलटून पालटून राहिलेला आहे आणि प्रत्येक संमेलन वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त झालेले आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील या संमेलन नामक ढोंगी कर्मकांडाची जोगळेकरांनी घेतलेली तिखट दखल म्हणूनच संस्मरणीय ठरते.
पाडगांवकरांच्या ‘भोलानाथ’ या बालकवितेचं जोगळेकरांनी फ्लर्टिंगच्या अंगानं केलेलं विडंबनही सरस उतरलं आहे. यावर ‘वयात आलेली अंतःप्रेरणा’ असं फर्मास भाष्य त्यांनी केलं आहे; तर पु. शि. रेगेंच्या ‘अहो आमचं घर पहा’ या अल्पाक्षरी तरल कवितेचं आणि शैलीचं विडंबन करताना विडंबनकारानं ऑफिस, साहेब, सेक्रेटरी असा आजच्या काळातही लागू पडणारा माहौल जिवंत उभा केला आहे. विडंबनांच्या प्रांतात दीर्घकवितांचे विडंबन करणे ही अतिशय कठीण गोष्ट असते; त्यासाठी त्या भाषेची समग्र काव्यपरंपरा ज्ञात असावी लागते. बुद्धिचातुर्याने, नर्मविनोदी शैलीत वसंत बापट यांच्या ‘मानसी’ या प्रदीर्घ मालिका कवितेमधील दीर्घांशांचे जोगळेकरांनी केलेलं वाङ्मयीन विडंबन त्यांच्या जाणकारीचा प्रत्यय देते. बापटांची ‘मानसी’ रोमॅंटिक आणि अविच्छिन्न एकजीवत्वाच्या सूत्रात गुंफलेली आहे; तर या दीर्घ कवितेच्या विडंबनात जोगळेकरांनी सहृदयतेने केलेलं मध्यमवर्गीय संसारचित्रण वास्तवदर्शी झालं आहे.
मराठी कवितेच्या समीक्षकांनी सर्वस्पर्शी प्रतिभेचे कवी ग. दि. माडगूळकर यांची दखल घेतली नसली तरी जोगळेकरांनी मात्र त्यांच्या ‘नागडे नातवंड’ या अनेक ताण निर्माण करणाऱ्या गंभीर कवितेची नोंद घेऊन त्यांना मुजरा केला आहे. निरागसता आणि भोवतालचं वास्तव यांतील द्वंद्व दर्शविणारी गदिमांची कविता, वाल्मीकींवर गदिमांचे संस्कार झाले असते तर वाल्मीकींनी तीच कविता कशी लिहिली असती अशी गमतीदार कल्पना करून विडंबनात रूपांतरित केली आहे. अस्सल विडंबनकाराकडे सहसर्जकत्वाची संवेदना असेल तर विडंबन कविताही कशी दर्जेदार उंचीवर जाऊन पोहोचते याचं हे उत्तम उदाहरण आहे. आरती प्रभूंच्या ‘सर्सर सर्सर वाजे’ या नितांत सुंदर निसर्गकवितेचं केलेलं ‘ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग वाजे’ हे विडंबनही सरस उतरलं आहे.
मी म्हणालो, ‘सांजतारा तू नि मी तो पाहू ये’
तू म्हणावे, ‘रानवारा दे ठरू ना वस्त्र हे’
या आरती प्रभूंच्या अतिशय तरल कवितेचं विडंबन करताना जोगळेकर कवी म्हणून असलेली त्यांची मूळ तरलता हरवू न देता ‘शो नावाचा’ या विडंबनात जी निर्मळ गंमत करतात, त्याची खुमारी औरच आहे. रोमॅंटिक प्रियकर आणि भलभलत्या व्यावहारिक शंका काढणारी प्रेयसी यांच्यातली ही जुगलबंदी लयदार झाली आहे.
या संग्रहात मराठी गझलचे कलंदर सम्राट सुरेश भट यांच्या दोन गाजलेल्या गझलांची विडंबने त्याच मूळ वृत्तांमध्ये साधण्याची किमया विडंबनकाराने केली आहे. यावरून जोगळेकरांनी गझलचे तंत्र आणि मंत्र आत्मसात केलेले आपल्या प्रत्ययाला येते. हास्यनिर्मिती करणाऱ्या अशा गझल विडंबनांना ‘हजल’च्या म्हणजे स्वतंत्र विनोदी गझलच्या पातळीवर नेणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे; पण जोगळेकर ते साध्य करतात. वर्गातली सुकन्या, ऑफिसबाला, सांगून आलेली या सगळ्या हजलगत नायकाला अशा भेटतात की –
ही ठोकरून गेली, ती ठोकरून गेली
जी भेटली मला ती वांधा करून गेली
आणि त्यानंतर भटांच्या ‘एल्गार’मधल्या शीर्षक गझलेतील गाजलेल्या, बहुचर्चित काबिल-ए-शेरांवर जोगळेकरांचे ‘सव्वाशेर’ एकामागून एक टक्करत येतात. एका विद्रोही गझलचे विडंबनकाराने मद्यालयीन दृश्य चित्रणार्थ केलेले विडंबन थक्क करणारे आहे. वाङ्मयीन निरीक्षणांबरोबरच अवाङ्मयीन निरीक्षणांची ‘स्वभाव’ या विडंबनातील मांडणी अर्थपूर्ण हास्यरस निर्माण करते.
‘बेहद’मध्ये समाविष्ट असलेल्या जोगळेकरांच्या ‘मी गुरू केले लघुला’, ‘झाकले माणिक’, ‘मराठी बाणा’ या स्वतंत्र हझलाही त्यांची गझल तंत्रावर असलेली पकड जाणवून देतात. सुभाष प्रभू या अपरिचित कवीच्या ‘रुबाई ‘चे विडंबनही या विधानाला पुष्टी देऊ शकेल.
ग्रेसच्या ‘जिवाची वैष्णवी, ‘ ‘पाऊस कधीचा पडतो’ आणि ‘आई’ या तीन गाजलेल्या कवितांची विडंबने जोगळेकरांची समग्र काव्यजाणीव दर्शविण्यास पुरेशी ठरावीत. ग्रेस हे मराठीतील इतके अनवट आणि स्वयंभू कवी आहेत की त्यांच्या शैलीचे एक वेळ अनुकरण करता येईल; पण त्यांच्या अंतरात्म्याशी सहानुभाव साधून विडंबनं करणं हे महाकर्मकठीण. या विडंबनांच्या सुरुवातीलाच आपल्या भाष्यावलीत जोगळेकर म्हणतात –
“इथवर तसा सरळ प्रवास केल्यावर, माझ्या अंतःप्रेरणेचा प्रतिमांच्या निबिड जंगलात प्रवेश अपरिहार्य होता. खुद्द ग्रेस यांच्या संलग्न प्रतिमांच्या किर्र पोताचा संस्कार अंगावर घ्यावा लागला.”
शंकर वैद्य यांच्या ‘शिलाहार नृपति-प्रथम अपरादित्य’ आणि ‘उत्तररंग’ या दोन कवितांची जोगळेकरकृत वाङ्मयीन विडंबने त्यांच्या वाङ्मयीन परंपरांच्या आणि परिक्षेत्र अभ्यासाची साक्ष देतात. संस्कृतप्रचुर प्रतिमाशैलीचे विडंबन करण्यासाठी – दूरचित्रप्रापक, विद्युदारोह, जलदगामिनी अशांसारख्या शब्दप्रतिमांची ‘शिलाहार’ मध्ये केलेली सहेतुक उपयोजना त्या विडंबनातील सामान्य नागरी प्रणयाराधनेचा विषय आणि आशय गमतीदारपणे अधोरेखित करते.
तू दोऱ्याने गुंडी शिवत होतीस
पण शिवता शिवता दोऱ्याचा पार गुंता झाला तुझ्या माझ्या संबंधात मला एवढंच सांगायचं आहे
या विडंबन काव्यपंक्तीमधून मूळ कवितेतील तरल मुग्ध आशयाभिव्यक्ती बाधित न करता निर्मळ विनोदनिर्मिती जोगळेकरांनी साधली आहे.
सर्वसाधारणपणे प्रस्थापित कवींच्या गाजलेल्या कवितांची विडंबने करून समांतर लोकप्रियता मिळविण्याचा विडंबनकारांचा प्रयत्न असतो; पण ‘बेहद्द’मध्ये सुनीता पुजार, ज्योती पागनीस, यशोधरा साठे, नितीन दादरावाला यांसारख्या दर्जेदार पण सर्वसामान्य काव्यरसिकांना अपरिचित असलेल्यांच्या कवितांची विडंबने करून जोगळेकरांनी आपली व्यापक काव्यदृष्टी दाखवून दिली आहे. सुनीता पुजार यांच्या ‘हे सोनचाफ्याचे फूल’ या उत्कट प्रेमकवितेचे काऊंटर रोमॅंटिसिझमने केलेले विडंबन असो की ज्योती पागनीसांच्या ‘ह्या काळोखात’मधल्या करकरीत निरोपाच्या क्षणांसमोर, काळोखात चाललेल्या विवाहबाह्य संबंधांवर टाकलेला प्रकाशझोत असो; जोगळेकर आपल्या आणि वाचकांच्या अभिरुचीचा आदर करताना दिसतात. मानवी संवेदना बधीर होत चालल्याकडे यशोधरा यांची ‘लिलाव’ ही गंभीर कविता लक्ष वेधते.
‘तुमचे झरे सुकून गेले? हरकत नाही आमच्या सुखाचा कालच लिलाव झाला आहे’
असा यशोधरा यांचा अटीतटीचा ‘लिलाव’, जोगळेकर ‘छत्री’ हा सामान्य विषय घेऊन नर्म विनोदाने विडंबित करतात.
तुमची छत्री चोरीला गेली? हरकत नाही ! आमची छत्री तरी आमची कुठे आहे?
यामधील ‘छत्री’च्या ठिकाणी ‘कविता’ हा शब्द विडंबनकाराने टाकला असता तर, अधिक मजा आली असती, असंही वाटून जातं.
युद्धाचे विनाशकारी रूप प्रतिमांकित करणारी दादरावाला यांची ‘पिरॅमिड’ ही एक उदास करणारी कविता आहे. या पिरॅमिडचे विडंबन करताना जोगळेकर त्याचा ‘ताजमहाल’ करतात आणि कॉलेजमधील क्लासरूमवरून आपला मिश्कील कॅमेरा फिरवतात.
ॲग्नेस यांच्या ‘किरमिजी घन’ या अलवार निसर्गचित्राचे रंग ‘घननीळ ध्यास’ या विडंबनातून किचनमध्ये शिरतात आणि गॅस संपल्यामुळे, अचानक आलेल्या पाहुण्यांना आता वाढायचं काय? असा गहन प्रश्न घरातल्या द्रौपदीला पडतो. दया पवार यांचं ‘दुःखानं गदगदणारं झाड’ जोगळेकरांच्या विडंबनात रूपांतरित होताना दलित चळवळीतील स्वतः मोठं होत जाणाऱ्या आणि आपल्याच समाजबांधवांपासून अंतर दुणावणाऱ्या नेत्यांच्या दुटप्पीपणावर नेमकं बोट ठेवतं. संग्रहातील स्वतंत्रपणे अवतरलेले ‘स्कूटरवरील आठ हायकू’ जोगळेकरांनी ‘हायकू’चेही मर्म जाणून घेतल्याचा प्रत्यय देतात.
आजूस बाजूस सुळसुळ स्कूटर्स
कमरेभोवती घट्ट विळखे
माझ्या पोटावर कातडी पट्टा
यासारख्या हास्यनिर्मिती करणाऱ्या व्यंगात्मक हायकूंना जपानी भाषेत ‘सेनऱ्यूs’ म्हणतात. जोगळेकरांचे ‘सेनऱ्यूs’ सकारात्मक जीवनदृष्टीमुळे विपरित परिस्थितीला हसत हसत सामोरे जातात.
महानोरांचे ‘हे पावसाळी दिवस’ रानावनांतले आहेत. विडंबनात ते शहरी जीवनदर्शन घडवतात. निसर्गाची चित्रलिपी रेखाटणारे आणि श्रद्धाशीलतेचा सत्त्वगुणी प्रत्यय देणारे मराठीतील आणखी एक महत्त्वाचे कवी म्हणजे वसंत सावंत.
मी स्कायलॅबसारखा कोसळतो तेव्हा तुम्ही आतून मला सावरत असता…
ही वसंत सावंतांची कविता अनेक संमेलनांमधून गाजली. त्यांच्या प्रतिमासृष्टीचा जन्म कोकणच्या मातीतून झालेला असल्याने तिला मराठी कवितेच्या मांदियाळीत पृथगात्मता प्राप्त झाली. जोगळेकरांनी हे त्यांचे वैशिष्ट्य नेमके हेरून ‘स्कायलॅब’चे विडंबन केले आहे आणि देवाचार, हुय्या हुय्या वगैरे शब्दांची पेरणी करून प्रथितयश साहित्यिकांच्या वर्तन-विसंगतीचा पर्दाफाश केला आहे.
दलित कवितेमध्ये ऐंशीच्या दशकात प्रल्हाद चेंदवणकरांनी आपला विद्रोह थेट रस्त्यावर आणून ठेवला. ‘रस्ता आमच्या बापाचा असतो’ ही त्यांची सर्वाधिक दाद मिळालेली कविता. आपल्या विडंबनातून जोगळेकरांनी नवोदित कवींचा विद्रोह किती तकलादू असतो, हे दाखवून देताना चेंदवणकरांच्या मूळ अस्सल विद्रोहाला बाधा आणू दिलेली नाही आणि उत्तम विडंबनकाराचे हेच तर कौशल्य असते.
अशोक नायगावकरांचा ‘वाटेवरच्या कविता’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला तेव्हा त्याची कोणी फारशी दखल घेतली नव्हती; पण साधारण १५ वर्षांपूर्वी ‘कवितांच्या गावा जावे’ या कार्यक्रमातून जेव्हा त्यांनी आपल्या खुसखुशीत मल्लिनाथीसह या कवितांचे सादरीकरण सुरू केले तेव्हा हळूहळू त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि आज तर ते महाराष्ट्रातील सर्वाधिक मागणी असणारे लोकप्रिय कवी आहेत. ‘टिळक’ ही त्यांची वारंवार फर्माईश होणारी भेदक कविता. जोगळेकरांनी मंचीय कवितेचे दोषदर्शन घडविण्यासाठी हाच भेदकपणा आपल्या विडंबनात वापरला आहे. नायगावकरांच्या सादरीकरण शैलीमुळे त्यांच्या गंभीर कवितांनाही श्रोते हसतात या विसंगतीवर बोट ठेवले आहे.
मराठी कवितेत ‘दशपदी’ हा काव्यप्रकार अनिलांनी आणला तर र. कृ. जोशी यांनी ‘दृश्यकविता’ प्रकाराची ओळख करून दिली; पण या काव्यप्रकारांच्या अंगभूत मर्यादांमुळे ते मराठी कवितासृष्टीत रूढ होऊ शकले नाहीत. आपल्या विडंबनांमधून जोगळेकरांनी या काव्यप्रकारातली कृत्रिमता उघड केली आहे. अरुण कोलटकर आणि दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे प्रचलित साहित्यव्यवहाराशी फटकून राहणारे आणि आपल्या कवितांमधून ॲबसर्ड प्रतिमासृष्टी आणणारे बहुचर्चित कवी. त्यांच्या प्रत्येकी दोन-दोन कवितांची विडंबने संग्रहात समाविष्ट आहेत. या चारही विडंबनांपैकी अरुण कोलटकरांच्या ‘घोडा’ या कवितेचं केलेलं विडंबन, ‘माझा (पण) बेहद्द नाममात्र घोडा’ या शीर्षकाने, प्रस्तुत संग्रहाचे नामकरण होऊन बसले आहे, यावरून त्याचे महत्त्व लक्षात यावे. कोलटकर हे तुकारामांच्या परखड परंपरेतील दंभभेदी कवी म्हणून ओळखले जातात. सामाजिक विषमतेच्या तळाशी जाताना त्यांची प्रतिभा वैयक्तिक अनुभवांना समष्टीच्या पातळीवर नेते. मानवी दुःख आणि वेदनेच्या उगमापर्यंत जात असताना कोलटकरांची काव्यऊर्जा दमदार घोडा होऊन तुफानी दौड मारते. आपल्या या विडंबन रचनांमधून जोगळेकरही वर्तनविसंगतीच्या आणि सामाजिक विरूपांच्या उगम आणि विकासापर्यंत पोहोचण्याची आस बाळगतात. आपणही याच व्यवस्थेचा एक भाग आहोत याची त्यांना जाणीव असल्याने कडकलक्ष्मीप्रमाणे शब्दांच्या चाबकाचे फटके स्वतःवरही मारत राहतात. घोड्याच्या टापांखाली रक्तबंबाळ होत राहतात.
‘माझा (पण) बेहद्द घोडा’मधील ही विडंबने मराठी कवितेत स्वतंत्र मुद्रा घेऊन आजही उभी असल्याने ती वारंवार चर्चेला येणे व त्यांचा ऊहापोह होणे अपरिहार्य आहे. अशा प्रकारचे दुर्मीळ प्रातिभिक गुण विकसित करीत नेणे आणि ते कायम धारदार ठेवणे, हे जोगळेकरांसमोरचे एक अनिवार्य आव्हान होऊन बसले आहे.
