संपादकीय : जयपूर लिटफेस्ट आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 

प्रतिवर्षी जानेवारीत जयपूर शहर एका वेगळ्याच कारणाने सांस्कृतिक विश्वाच्या केंद्रस्थानी येते – निमित्त असते तेथे भरणाऱ्या जयपूर लिटफेस्टचे. नुसत्या भारताचेच नाही; तर एक प्रकारे जगाचे लक्ष वेधून घेण्यात या आयोजनाला यश आले आहे. सुरू होण्याच्या आधी दरम्यान आणि नंतरदेखील सर्व प्रसार माध्यमे या फेस्टिवलला चांगली प्रसिद्धी देतात. आयोजनादरम्यान सादर झालेले अनेक चांगले कार्यक्रम नंतर विविध समाजमाध्यमांतून पाहायला मिळतात. दिवसेंदिवस या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढते आहे. हाही एक प्रकारचा सांस्कृतिक उत्सव असल्याने याची आपल्याकडे होणाऱ्या वार्षिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाशी थोडीशी तुलना करण्याचा मोह आवरत नाही. २००६ मध्ये सुरू झालेल्या या उत्सवात जगभरातील प्रसिद्ध लेखक, विचारवंत, कलाकार आणि राजकारणी सहभागी होतात.५ दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध विषयांवर चर्चासत्र, वादविवाद, पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम, कविता वाचन, नाट्यप्रयोग, संगीत कार्यक्रम यांची रेलचेल असते. उत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार ५०० पेक्षा जास्त वक्ते १००० पेक्षा जास्त कार्यक्रमांत सहभागी होतात. यात प्रामुख्याने हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये कार्यक्रम होतात आणि उत्स्फूर्त व उत्साही प्रेक्षक सहभाग हे याचे एक वैशिष्ट्य आहे.जयपूरच्या हवामहल आणि दिग्गी पॅलेससारख्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन होते. राजस्थान व राजस्थानी संस्कृती केंद्रभागी असते; परंतु इतरही विविध संस्कृतींचा अनुभव यावा यासाठी खास प्रयत्न केले जातात. यामध्ये कला आणि हस्तकलांचे प्रदर्शन व विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद यांचाही समावेश असतो. साहित्यप्रेमी आणि कलाकारांसाठी एकत्र येण्याची आणि संवाद साधण्याची उत्तम संधी असे याकडे बघितले जाते आणि सर्व कार्यक्रम त्याच दृष्टिकोनातून आयोजित होतात. संजय रॉय हे या उत्सवाचे आयोजक आहेत. ‘टीमवर्क आर्ट्स’ नावाच्या त्यांच्या संस्थेमार्फत या उत्सवाचे व अशा अनेक सांस्कृतिक उत्सवांचे जगभरात आयोजन केले जाते; त्यामुळे या उत्सवाचे आयोजन एक  खासगी संस्था करते असे म्हणावे लागेल. यातील काही कार्यक्रमांना शुल्क असते; तर काही मोफत असतात. एकेका कार्यक्रमाला वेगवेगळे प्रायोजक असतात. अनेक बिनीची हिंदी व इंग्रजी दैनिके व दूरदर्शन वाहिन्या कार्यक्रमांना प्रायोजकत्व देतात. काही कार्यक्रमांचे थेट प्रसारण करून प्रेक्षक सहभाग वाढवला जातो. सरकारी मदत या संमेलनाला मिळत असल्याचा उल्लेख कोठे पाहायला मिळाला नाही.
आता थोडेसे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी : ग्रंथप्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८ च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ‘ज्ञानप्रकाश’ (फेब्रुवारी ७, १८७८) मध्ये प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११, १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले. प्रदीर्घ परंपरा असूनही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गेल्या काही वर्षांपासून थोडेसे मागे पडताना दिसत आहे. संमेलनाध्यक्षांची निवड, संमेलनातील राजकारणी लोकांचा सहभाग, संमेलनांचा वाढता खर्च हे काही विषय या संदर्भात प्रतिवर्षी चर्चेला येतात. महाराष्ट्र राज्य शासन या संमेलनाला भरीव आर्थिक मदत करते; तर जयपूर लिटफेस्ट उत्सवाच्या खर्चासाठी शासनावर अजिबात अवलंबून नसते. कार्यक्रमात राजकारणी लोक मोकळेपणाने सहभागी होतात; अर्थात ते नुसते राजकारणी नसतात; तर काव्य,शास्त्र, विनोद याची जाण राखणारे व प्रसंगी उत्तम लिखाण करणारे लोक असतात. असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरती या उत्सवात चर्चा होतात. कालसुसंगत विषय अशा पद्धतीने येथे हाताळले जात असल्यामुळे तरुणांचा सहभाग खूप असतो. मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी या उत्सवाचे सरसकट अंधानुकरण करावे असे मुळीच नाही; परंतु स्वायत्तपणे अशी संमेलने चालवणे आणि नवीन पिढीचा सहभाग मिळवणे यासाठी जयपूरवाले काय काय करतात त्याचा अभ्यास व्हायला काय हरकत आहे ?

Author

2 thoughts on “संपादकीय : जयपूर लिटफेस्ट आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 

  1. जयपूर लिटफेस्ट अन् अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ” Short but Sweet” तुलना ! 😊

  2. जयपूर लिटफेस्ट जो शासकीय अनुदानावर अवलंबून नाही,असे कार्यक्रम उत्तरोत्तर वाढणारच ! तो चांंगले मूूळ धरू लागला आहेच,इतकेच नव्हे लवकरच साहित्य संमेलनांपेक्षा अधिक लोकप्रिय होईल,यास भविष्यवेत्त्याची गरज नाही.
    हुशार मार्केटिंग व बथ्थड कामचलाऊ शासनयंत्रणा यामधील फरक तो हाच!

Leave a Reply